मुंबई : गणेशोत्सवासाठी महापालिकेने विविध सोयी सुविधा उपलब्ध केल्या असून येत्या ६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीदिनी होणाऱ्या विसर्जनासाठीही महापालिका सज्ज झाली आहे. विसर्जनस्थळी प्रथमोपचार केंद्रांसह रुग्णवाहिका, क्रेन, नियंत्रण कक्ष, जर्मन तराफे, तात्पुरती शौचालये, फ्लडलाईट, सर्चलाईट आदी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच, समुद्राच्या किनारपट्टीवर सध्या ‘ब्लू बटन जेलीफीश’, ‘स्टिंग रे’ प्रजातीच्या माशांचा वावर अधिक प्रमाणात आहे. त्यामुळे मत्स्यदंश होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
विसर्जन सुलभ व निर्विघ्नपणे पार पडावे, यासाठी महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेचे जवळपास २४५ नियंत्रण कक्ष तयार करण्यात आहेत. महानगरपालिकेच्या विविध खात्यातील कर्मचा-यांमध्ये योग्य समन्वय साधण्यासाठी मुख्य नियंत्रण कक्षासह प्रशासकीय विभागांच्या स्तरावर २४५ नियंत्रण कक्ष आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने १२९ निरीक्षण मनोरे उभे करण्यात आले आहेत. विसर्जनस्थळी ४२ क्रेनचीही व्यवस्था करण्यात आली आहे. विविध ठिकाणी २८७ स्वागत कक्ष तयार करण्यात आले आहेत. विसर्जनस्थळी येणाऱ्या भाविकांसाठी आरोग्य विभागाकडून २३६ प्रथमोपचार केंद्रांसह ११५ रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. प्रकाश योजनेसाठी सुमारे ६ हजार १८८ प्रकाश झोत दिवे (फ्लडलाईट) आणि शोधकार्यासाठी १३८ दिवे (सर्चलाईट) लावण्यात आले आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी पालिकेने १९७ तात्पुरती शौचालयेही उपलब्ध करुन दिली आहेत. त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी महानगरपालिकेतर्फे अग्निशमन दलाच्या सुसज्ज वाहनासहीत प्रशिक्षित मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे.
मुंबईतील घरगुती तसेच सार्वजनिक गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी मागील दोन महिन्यांपासून पूर्वतयारी सुरू आहे. विसर्जनासाठी येणारी वाहने चौपाटीवरील वाळूत अडकू नयेत व मूर्तींचे विसर्जन सुरळीतपणे व्हावे, यासाठी विविध ठिकाणच्या चौपाटीच्या किनाऱ्यांवर १ हजार १७५ स्टील प्लेट तसेच छोट्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी विविध ठिकाणी ६६ जर्मन तराफ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. चौपाट्यांवर सुरक्षेसाठी २ हजार १७८ जीवरक्षकांसह ५६ मोटरबोटी तैनात करण्यात आल्या आहेत. निर्माल्य संकलित करण्यासाठी ५९४ निर्माल्य कलशांसह ३०७ निर्माल्य गोळा करणाऱया वाहनांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती उप आयुक्त व गणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे यांनी दिली.
दरम्यान, यंदा गणेशमूर्ती विसर्जनासाठी ७० नैसर्गिक स्थळांसह सुमारे २९० कृत्रिम विसर्जनस्थळांवर व्यवस्था करण्यात आली आहे. अधिकाधिक भाविक तसेच सार्वजनिक मंडळांनी गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
विसर्जनादरम्यान नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी?
– विसर्जनावेळी नागरिकांनी समुद्राच्या खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न करु नये.
– मूर्ती विसर्जनाकरीता महानगरपालिकेमार्फत नेमलेल्या प्रशिक्षित मनुष्यबळाची मदत घ्यावी.
– काळोख असणाऱ्या ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जन टाळावे.
– महानगरपालिकेने पोहण्यासाठी निषिद्ध केलेल्या क्षेत्रात जाण्याचा प्रयत्न करू नये.
– समुद्रात किंवा तलावात कुणी बुडत असल्याचे निदर्शनास आल्यास त्वरित अग्निशमन दलाचे जवान, पोलिस किंवा जीवरक्षकांना कळवावे.
– कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नये किंवा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.
– लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. त्यांना पाण्यात जाऊ देऊ नये.
विसर्जनाच्या दिवशी समुद्राला भरती
अनंत चतुर्दशी दिवशी म्हणजेच ६ सप्टेंबर रोजी समुद्रात सकाळी ११.९ वाजता ४.२० मीटरची भरती, सायंकाळी ५.१३ वाजता १.४१ मीटरची ओहोटी तसेच रात्री ११.१७ वाजता ३.८७ मीटर उंचीची भरती असेल. दुसऱ्या दिवशी म्हणजे ७ सप्टेंबर रोजी पहाटे ५.६ मिनिटांनी ०.६९ मीटरची ओहोटी, सकाळी ११.४० वाजता ४.४२ मीटरची भरती असेल. विसर्जनासाठी चौपाट्यांवर येणाऱ्या नागरिकांनी भरती व ओहोटीदरम्यान सतर्क राहावे, असे महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
मत्स्यदंशापासून सावधान
ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत मुंबई येथील समुद्राच्या किनारपट्टीवर ‘ब्लू बटन जेलीफीश’, ‘स्टिंग रे’ प्रजातीच्या माशांचा वावर अधिक दिसून येतो. विसर्जनादरम्यान मत्स्यदंश होऊ नये, याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. मत्स्यदंशाची घटना घडल्यास चौपाटी परिसरात वैद्यकीय कक्ष सज्ज ठेवण्यात आला आहे. तसेच १०८ रूग्णवाहिकादेखील तैनात करण्यात आली आहे.