मुंबई ः ऑक्टोबर महिना सुरू झाल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने आता आपल्या रस्ते कॉंक्रीटीकरणाच्या कामाला पुन्हा सुरूवात करण्याचे ठरवले आहे. पावसामुळे चार महिने थांबलेले कॉंक्रीटीकरणाचे काम या आठवड्यापासून पुन्हा सुरू होणार आहे. पावसाळ्यापूर्वी अर्धवट अवस्थेत बंद केलेल्या ५७६ रस्त्यांची कामे प्राधान्याने हाती घेतली जाणार आहे. तसेच ही सर्व कामे करताना नागरिकांच्या सोयीचा विचार केला जाणार आहे.
मुंबई महापालिकेने गेल्या काही वर्षांपासून रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणाचा प्रकल्प हाती घेतला आहे. यामध्ये टप्प्याटप्प्याने रस्ते कॉंक्रीटीकरण केले जात आहे. गेल्या दोन वर्षांत मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते विभागाने कॉंक्रीटीकरणाच्या कामासाठी तब्बल १२ हजार कोटींच्या महानिविदा काढल्या होत्या. दोन टप्प्यात ही कामे सुरू आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील कामे जानेवारी २०२३ मध्ये सुरू झाली, तर दुसऱ्या टप्प्यातील कामे ऑक्टोबर २०२४ मध्ये सुरू झाली. रस्ते सिमेंट काँक्रीटीकरण प्रकल्पाच्या टप्पा १ आणि टप्पा २ अंतर्गत ३१ मे २०२५ अखेर एकूण १३८५ रस्त्यांचे मिळून ३४२.७४ किलोमीटर लांबीचे काँक्रीटकरण पूर्ण करण्यात आले. ५७६ रस्त्यांची कामे पावसामुळे बंद करण्यात आली होती. तर ७७६ रस्त्यांच्या कामांना अद्याप सुरूवातही झालेली नाही. ही कामे जानेवारी २०२६ नंतर सुरू होऊ शकणार आहेत, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
नागरिकांच्या सोयीचा विचार होणार
रस्ते कॉंक्रीटीकरणाची कामे संपूर्ण मुंबईभर सुरू असून या कामांमुळे पावसाळ्यापूर्वी नागरिकांना खूप त्रास सोसावा लागला होता. अनेक ठिकाणी रहिवाशांना इमारतीतून बाहेर पडणे मुश्कील झाले होते. काही इमारतींच्या आजूबाजूचे सगळे रस्ते एकाच वेळी खोदून ठेवले होते. या सगळ्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सोसावा लागला होता. रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणाच्या कामामुळे होणाऱ्या या त्रासाबद्दलचा मुद्दा विधिमंडळाच्या अधिवेशनातही उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे पालिकेवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. ऑक्टोबर महिन्यात रस्ते कामे सुरू करताना कामांची इत्यंभूत माहिती देण्याकरीता एक डॅशबोर्ड तयार करण्यात आला आहे. त्यावर नागरिकांना आपल्या परिसरातील कोणत्याही रस्त्याच्या कामाची इत्यंभूत माहिती मिळू शकणार आहे.
नागरिकांच्या सोयीला प्राधान्य
अर्धवट अवस्थेत बंद केलेल्या ५७६ रस्त्यांच्या कामांसाठी वाहतूक पोलिसांची परवानगी मिळाली आहे. परंतु, ही परवानगी मिळाली म्हणून सगळ्याच रस्त्यांचे काँक्रीटीकरण एकाच वेळी हाती घेतले जाणार नाहीत. तर रस्त्याचे काम हाती घेताना नागरिकांच्या सोयीला प्राधान्य दिले जाईल. तसेच कोणत्याही इमारतीचा गृह संकुलाचा, वसाहतीचा पूर्ण मार्ग बंद होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. तसेच एकाच परिसरातील अनेक रस्ते एकाच वेळी खोदले जाणार नाहीत याचीही काळजी घेतली जाणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.
रस्त्यांची कामे २०२७ पर्यंत चालणार
अर्धवट अवस्थेतील ५७६ रस्त्यांची कामे डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे. अद्याप सुरू न केलेल्या कामांना जानेवारी २०२६ मध्ये सुरूवात होणार असून ही कामे मे २०२७ पर्यंत चालणार आहेत.
काँक्रिट कामे अंशत: पूर्ण
१) रस्ते संख्या – ५७४
२) एकूण लांबी – १५६.७४ किलोमीटर
अद्याप कामे सुरू झाली नाहीत
१) रस्ते संख्या – ७७६
२) एकूण लांबी – २०८.७० किलोमीटर