मुंबई : वापरलेले सॅनिटरी पॅडस्, डायपर, कालबाह्य औषधे आदी वैयक्तिक वापराशी संबंधित घातक औषधे चे मुंबई महापालिका संकलन करणार आहे. मुंबई महापालिकेची विशेष सेवा १ मेपासून सुरू झाली. मुंबईतील विविध गृहनिर्माण संस्था, निवासी संकुल, श्रृंगार केंद्र (ब्यूटी पार्लर), महिला वसतिगृह, शैक्षणिक संस्था आदी आस्थापनांना या सेवेचा लाभ घेता येणार असून पहिल्याच दिवशी २०९ संस्थांनी नोंदणी केली.
मुंबईत दररोज सुमारे सात ते आठ हजार टन घनकचरा निर्माण होतो. यापैकी सुमारे ७० ते ८० टन कचरा वैयक्तिक स्वच्छतेशी संबंधित असतो. मुंबई महापालिकेने या कचऱ्याला ‘घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचरा’ असे नाव दिले आहे. हा कचरा गोळा करण्यासाठी आतापर्यंत कोणतीही सोय नव्हती. त्यामुळे मुंबईतील रहिवासी सगळा कचरा एकत्रच कचरापेटीत टाकतात. त्यामुळे या कचऱ्याचे विलगीकरण करणे अवघड होते. त्यामुळे अशा घातक कचऱ्याच्या संकलनासाठी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाने १ मेपासून सेवा कार्यान्वित केली आहे.
यासाठी संबंधित आस्थापनांना रितसर नोंदणी करण्याचे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाने केले होते. नोंदणीची प्रक्रिया २२ एप्रिल २०२५ पासून कार्यान्वित करण्यात आली होती. मुंबईतील २०९ संस्थांनी १ मेपर्यंत नोंदणी केली आहे. स्वच्छताविषयक विशेष काळजीयोग्य कचऱ्यांचे संकलन करण्यासाठी पिवळ्या रंगाच्या पिशव्यांचा वापर करण्यात येणार आहे. सेवेसाठी नोंदणी केलेल्या आस्थापनांमध्ये प्रत्यक्ष जाऊन कचऱ्याच्या विलगीकरणाबाबत जनजागृतीही करण्यात येईल, अशी माहिती उपायुक्त किरण दिघावकर यांनी दिली.
नोंदणी कशी करायची ?
गृहनिर्माण संस्था, निवासी संकुले, श्रृंगार केंद्र (ब्यूटी पार्लर), महिला वसतिगृहे व शैक्षणिक संस्था आदी आस्थापनांना या सेवेचा लाभ घेता येईल. सेवेचा लाभ घेण्यासाठी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSc6zR8XHoOzXRNanCCdj4oKtS27Iu7vuaXBANiCGoKCfUCn5g/viewform या लिंकवर जाऊन नोंदणी करावी. तथापि, मुंबईतील नोंदणीकृत आस्थापनांना व्हॉट्स ॲप, तसेच अन्य माध्यमातून क्यूआर कोड पाठविण्यात येत आहे. सदर, क्यूआर कोड स्कॅन करूनही नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती किरण दिघावकर यांनी दिली.
घातक कचऱ्यामध्ये याचा समावेश
प्रामुख्याने वापरलेले सॅनिटरी नॅपकिन्स, डायपर्स, टॅम्पॉन्स, निरोध आणि इतर स्वच्छतासंबंधित बाबींचा, तसेच शरीर पुसण्यासाठी वापरलेले विविध द्रवांनी दुषित कापूस, बँडेजेस (जसे की लघवी, रक्त, लाळ, पू, विष्ठा, नखांनी दूषित झालेले), कालबाह्य औषधे (इंजेक्शन, सुई, रेझर ब्लेड्स) आणि श्रृंगार केंद्रामध्ये (ब्यूटी पार्लर)निर्माण होणारा कचरा (वॅक्सिंग स्ट्रिप्स, पीपीई) आदींचा समावेश असतो. हा अत्यंत घातक कचरा असला तरी अनेक वेळा त्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि सामान्य घरगुती कचऱ्यामध्येच ते टाकले जाते. त्यामुळे, कचरा संकलित करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण होतो. त्यावर प्रक्रिया करणे अवघड होते.