Mumbai Municipal Corporation मुंबई : मराठा नेते मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात आझाद मैदानात सुरू असलेले मराठा आंदोलन मिटल्याने आंदोलकांनी मैदान मोकळे केले आहे. मात्र, पाच दिवसांच्या कालावधीत आझाद मैदानात व आसपासच्या परिसरात प्रचंड कचरा जमा झाला होता. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करत तेथील भागाची स्वच्छता केली. आंदोलनाच्या पाच दिवसांमध्ये पालिकेने आझाद मैदान व आसपासच्या परिसराची स्वच्छता करत १२५ टन कचरा गोळा केला.

मराठा समाजाला कुणबी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी राज्य शासनाने मान्य केल्यानंतर आझाद मैदानात सुरू असलेले मराठा आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर मंगळवारी जल्लोष साजरा करून आंदोलक आपापल्या गावी परतले. मात्र, पाच दिवसांपासून आझाद मैदान व परिसरात आंदोलन सुरू असल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला होता. त्या स्वच्छता कामांसाठी महापालिकेने हजारो कामगार कर्मचारी आंदोलनस्थळी तैनात केले होते. दरम्यान, शुक्रवार ते मंगळवार या कालावधीत महापालिकेने आझाद मैदान व आसपासच्या परिसरातून सुमारे १२५ टन कचरा जमा केला व त्याची विल्हेवाट लावली. या स्वच्छता कामांमुळे पालिका कामगारांना मोठी कसरत करावी लागली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, महानगरपालिकेच्या माध्यमातून सलग पाच दिवस आंदोलनकर्त्यांना नागरी सेवा-सुविधा पुरवण्यासाठी पालिकेने प्रयत्न केले.

आझाद मैदान व परिसरात २९ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या पाच दिवसांच्या कालावधीत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. विविध संयंत्रे तसेच वाहनांचा वापर करत घनकचरा व्यवस्था विभागाने रस्ते स्वच्छ केले. पाच दिवस केलेल्या स्वच्छता मोहिमेअंतर्गत ६ मोठे कॉम्पॅक्टर, लहान ६ कॉम्पॅक्टर, कचरा वहन गाडी, प्रत्येकी दोन सक्शन आणि जेटींग संयंत्रे, १३ एससीव्ही, ५२ टॅंकर्स अशा ९६ वाहनांचा वापर दोन्ही सत्रांमध्ये करण्यात आला. आंदोलनाची सांगता झाल्यानंतर आझाद मैदान आणि महानगरपालिका परिसरात कामगारांनी मंगळवारी रात्रीपासून ३ सप्टेंबरच्या पहाटेपर्यंत अविरतपणे स्वच्छता करून संपूर्ण परिसर पूर्ववत केला. आंदोलनकर्त्यांनीही पालिकेला स्वच्छता कामांमध्ये हातभार लावत परिसर स्वच्छ केला.

पालिकेच्या घनकचरा विभागामार्फत २९ ऑगस्ट रोजी ४ टन, तर ३० ऑगस्ट रोजी ७ टन कचरा जमा झाला. त्यांनतर, ३१ ऑगस्ट रोजी ३० टन, १ सप्टेंबर रोजी ३० टन व २ सप्टेंबर रोजी (पहिले सत्र) ३० टन कचरा जमा करण्यात आला.

५०० किलो पिशव्यांचे वितरण

पहिल्या दिवसापासूनच आंदोलनकर्त्यांच्या सुविधेसाठी तीन ठिकाणी फिरती (मोबाईल) शौचालये उपलब्ध करून देण्यात आली होती. पाच दिवसांच्या कालावधीत एकूण ४५० फिरती (पोर्टेबल) शौचालये आंदोलनकर्त्यांच्या वापरासाठी महानगरपालिकेने उपलब्ध करून दिली होती. तसेच कचरा संकलनासाठी सुमारे ५०० किलो इतक्या थैल्या (डस्टबिन बॅग) देण्यात आल्या होत्या. आंदोलनकर्त्या बांधवांनीही या पिशव्यांचा वापर करून कचरा संकलनासाठी सहकार्य केले.

कीटकनाशक व जंतूनाशक उपाययोजना

आझाद मैदान आणि परिसरात स्वच्छतेच्या अनुषंगाने जंतूनाशक १०० किलो भुकटी तसेच १०५० किलो ब्लिचिंग भुकटी फवारणी करण्यात आली होती. डासांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आणि कीटक नियंत्रणासाठी दोन्ही सत्रांमध्ये महानगरपालिकेचा कीटक नाशक विभागाचा चमू कार्यरत होता. या चमूद्वारे सातत्याने धूम्रफवारणी, जंतूनाशक फवारणी संपूर्ण परिसरात करण्यात आली.