मुंबई : केंद्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ऐच्छिक रक्तदान पंधरवडा साजरा करण्यात येत असून मुंबई महानगरपालिकेन या अंतर्गत आयोजित केलेल्या विविध रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून केईएम, शीव, नायर व कूपर या चार प्रमुख रुग्णालयांनी मिळून दहा दिवसांमध्ये सुमारे ३,३५४ रक्त पिशव्या रक्त संकलित केले. रक्तदान शिबिरांमध्ये अधिकाधिक संख्येने नागरिकांनी सहभाग होऊन रक्तदान करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे.

केंद्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे देशभर राष्ट्रीय स्वेच्छा रक्तदान दिवस साजरा करण्यात येत आहे. त्यानुसार, १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ऐच्छिक रक्तदान पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख रुग्णालयांतर्फे या कालावधीत रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. केईएम रुग्णालयाच्या वतीने आयोजित शिबिरांत ८१६ रक्त पिशव्या, शीव रुग्णालयाच्या वतीने १ हजार २०० रक्त पिशव्या, नायर रुग्णालयाच्या वतीने ३९६ रक्त पिशव्या, आणि कूपर रुग्णालयाच्या वतीने सुमारे ९४२ रक्त पिशव्या इतके रक्तसंकलन करण्यात आले आहे. रक्तदानामुळे थॅलेसेमिया, हिमोफिलिया, सिकलसेल, ल्युकेमिया तसेच अपघात, प्रसुती, अतिदक्षता, रक्तक्षय आणि अतिरक्तस्राव यासह विविध गरजू रुग्णांचे प्राण वाचवणे शक्य होते. एका व्यक्तीने फक्त ३५० मिलिलिटर रक्तदान केल्याने ४ जणांचे प्राण वाचू शकतात.

रक्तदान शिबिरांचे आयोजन यापुढेही करण्यात येणार असून, ठिकठिकाणी आयोजित रक्तदान शिबिरांसाठी, संबंधित प्रमुख रुग्णालयाकडून मनुष्यबळ तसेच संसाधने पुरवली जात आहेत. दरम्यान, कूपर रुग्णालयात १ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिनानिमित्त शपथ देखील घेतली जाणार आहे.

१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिवस

रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी ऐच्छिक रक्तदात्यांचे योगदान अधोरेखित करण्याकरिता १ ऑक्टोबर हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतातील ऐच्छिक रक्तदान चळवळीचे प्रणेते, तसेच इंडियन सोसायटी ऑफ ब्लड ट्रान्सफ्यूजन अँड इम्युनोहेमॅटोलॉजीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जय गोपाल जॉली यांचा जन्म १ ऑक्टोबर १९२६ रोजी झाला होता. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा दिवस साजरा केला जातो.

रक्तदात्याला वर्षभरात मिळते विनामूल्य रक्त

रक्तदान केल्यानंतर संबंधित व्यक्तीला प्रमाणपत्र आणि कार्ड प्रदान केले जाते. रक्तदान कार्डाचा महत्त्वाचा उपयोग म्हणजे संबंधित व्यक्तीला एक वर्ष आवश्यकता भासल्यास विनामूल्य रक्त पुरवले जाते अथवा त्याचे कुटुंबीय आणि नातेवाईक यांना गरज भासल्यास त्यांना सवलतीच्या दरात रक्त उपलब्ध करण्यात येते.