मुंबई : महानगरपालिकेच्या विविध खात्यातील कर्मचारी – कामगारांना दिवाळीनिमित्त दिल्या जाणाऱ्या सानुग्रह अनुदानाची ओढ लागली आहे. द म्युनिसिपल युनियनने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी कामगार – कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याची मागणी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे.

महानगरपालिका प्रशासनाकडून कोणताही नकार नसताना द म्युनिसिपल युनियनने आयुक्तांकडे सानुग्रह अनुदानाबाबत मागणी केली आहे. दरवर्षी दिवाळीपूर्वी आयुक्तांना याबाबत पत्र पाठविले जाते. गेल्या काही वर्षांपूर्वी सानुग्रह अनुदानाबाबत करार होत असे. मात्र, कराराची पद्धत बंद झाल्यापासून दरवर्षी दिवाळीपूर्वी पालिका प्रशासनाला पत्र पाठवले जाते.

दरवर्षीप्रमाणेच म्युनिसिपल युनियनने प्रशासनाला पत्र पाठवून २० टक्के एवढी रक्कम सानुग्रह अनुदान म्हणून देण्याची मागणी केली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या कायम कामगार, कर्मचारी, अधिकारी, निरिक्षकीय कर्मचारी, सुरक्षा दल कर्मचारी, आरोग्य खात्यातील आरोग्य सेविका, सर्व कंत्राटी कामगार, बहुउद्देशीय कामगार, आरसीएच २ मधील कर्मचारी, मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेतील कर्मचारी, एनयुएचएम तथा डी. एस. एंटरप्राइजेजमार्फत कुटुंब कल्याण व माता बाल संगोपन विभागात कार्यरत असणारे कर्मचारी तसेच बालवाडी शिक्षिका व मदतनीस यांना प्रतिवर्षांप्रमाणे सन २०२४ २५ या आर्थिक वर्षाचा बोनस, सानुग्रह अनुदान द्यावे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

मुंबई महानगरपालिकेकडून कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांना वर्षांनुवर्षे सातत्याने विनाखंड सानुग्रह अनुदानाचे प्रदान केले आहे. या पार्श्वभूमीवर ही मागणी मंजूर करणे आवश्यक आहे. या मागणीवर चर्चा करून निर्णय घेण्याच्या अनुषंगाने त्वरित बैठकीचे आयोजन करावे करावे, अशीही मागणी आयुक्तांकडे करण्यात आली आहे.