चारित्र्याच्या संशयावरून भर रस्त्यात पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घाटकोपर पूर्व येथे काल (रविवार) रात्री घडली. याप्रकरणी टिळक नगर पोलिसांनी पती व त्याच्या साथीदाराला अटक केली.

दिपाली जावळे (३७) असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांचा गळा,चेहरा आणि हातावर आरोपीने वार केले असून हत्येत वापरलेला चाकू हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी आरोपी पती सतीश जावळे व त्याच्या साथीदाराला टिळक नगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सतीश हा वरळी येथील रहिवासी आहे. त्याच्याविरोधात यापूर्वी भायखळा व वरळी पोलीस ठाण्यात धमकावणे व मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपीने घाटकोपर पूर्व येथील एम. जी. रोडवरील पदपथावर पत्नीला गाठले. चारित्र्याच्या संशयावरून तसेच पत्नी आपल्यासोबत नांदायला येत नसल्याच्या रागातून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर सतीशने दिपालीवर चाकूने वार केले. जखमी दिपालीला तात्काळ घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. पण तेथील डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. याप्रकरणी दिपाली यांची आई नंदा भिंगारे यांच्या तक्रारीवरून टिळक नगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पती व त्याच्या सोबत असलेल्या एका साथीदाराला ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.