इमारत मोडकळीस आल्याने देवनार प्रसुतीगृह बंद करण्यात आले असून या परिसरातील महिलांना शताब्दी रुग्णालयात जावे लागते. मात्र प्रसुतीसाठी तेथे दाखल करून घेण्यात न आल्याने एका महिलेला आपले बाळ गमवावे लागल्याची घटना घडली.
देवनार प्रसुतीगृहाची इमारत धोकादायक बनल्यामुळे हे प्रसुतीगृह ऑक्टोबरमध्ये बंद करण्यात आले. मात्र या परिसरात दुसरे प्रसुतीगृह नसल्याने महिलांना प्रसुतीसाठी शताब्दी रुग्णालयात जावे लागते. बैंगनवाडीमध्ये राहणाऱ्या नजमा बेगम या गर्भवती महिलेने देवनार प्रसुतीगृहात नाव नोंदणी केली होती. मात्र ऑक्टोबरमध्ये ते बंद करण्यात आले. प्रसुतीकळा जाणवू लागल्याने नजमा बेगम शताब्दी रुग्णालयात गेल्या. मात्र त्यांना तेथे दाखल करून घेण्यात आले नाही. त्यामुळे त्या घरी परतल्या. घरी येताच त्यांना असह्य़ वेदना होऊ लागल्या आणि बाळ बाहेर येवू लागले. मात्र तशाच अवस्थेत त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. या धावपळीत त्यांच्या बाळाचा मृत्यू झाला, अशी माहिती समाजवादी पार्टीचे गटनेते रईस शेख यांनी दिली.
देवनार प्रसुतीगृह लल्लूभाई कम्पाऊंड येथे हलवण्याच्या मागणीकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेख यांनी केला.
लुटारू रिक्षाचालक अटकेत
मुंबई : मध्यरात्री रिक्षात बसलेल्या एका प्रवाशाच्या गळ्यातील सोनसाखळी आणि इतर ऐवज चोरणाऱ्या रिक्षाचालकाला देवनार पोलिसांनी अटक केली. चेंबूर येथील रहिवाशी बाळासाहेब बेडकळे (३७) हे सोमवारी रात्री पाऊणच्या सुमारास राहुल रोहिरे या रिक्षाचालकाच्या रिक्षात बसले होते. रिक्षा गोवंडीच्या हनुमान मंदिर पुलाजवळ आली असता राहुलने रिक्षा थांबवली आणि बेडकळे यांना मारहाण करत त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी आणि लॉकेट काढून घेतल व पळ काढला. लुटलेल्या ऐवजाची किंमत ८७ हजार रुपये आहे. सकाळी बेडकळे त्याच जागेवर चौकशी करण्यासाठी गेले होते. तेव्हा तेथील एका रहिवाशाने चालकाच्या वर्णनावरून त्याचे नाव आणि पत्ता सांगितला. देवनार पोलिसांनी राहुल रोहिरे याला अटक केली.
बेस्टच्या दोन बसची टक्कर, दोन जखमी
मुंबई : बेस्टच्या मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर बेस्टच्याच दोन बसगाडय़ांची टक्कर मंगळवारी झाली. कुलाब्यावरून छत्रपती शिवाजी टर्मिनसला येणारी १३९ क्रमांकाची बस बेस्ट भवनाजवळील सिग्नलला उभी होती. या बसला मागून येणाऱ्या एएस-६ या क्रमांकाच्या वातानुकुलित बसने धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, १३९ क्रमांकाची बस पुढे असलेल्या टॅक्सीवर आदळली. ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे वातानुकुलित बसचे चालक सचिन खरे यांनी सांगितले. या अपघातात १३९ क्रमांकाच्या बसचे चालक आणि वाहक जखमी झाले. या दोघांनाही सेंट जॉर्जेस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची चौकशी होणार आहे.
शहापूरमध्ये नाल्यात महिला, मुलीचा मृतदेह सापडला
शहापूर : वाशिंदजवळील पाली गावाच्या हद्दीत एका नाल्यात मंगळवारी अनोळखी महिलेसह तान्हुल्या मुलीचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
मृत महिला साधारणपणे ३० वर्षांची असून मुलीचे वय सात ते आठ महिन्यांचे आहे. मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास दोन्ही मृतदेह आढळून आल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. मृत महिला आणि मुलीची अद्याप ओळख पटलेली नाही. या प्रकरणी शहापूरचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत वाघुंडे यांनी सखोल तपास करण्याचे आदेश दिले आहेत.
५६ बालकामगारांची सुटका
मुंबई: चामडय़ाच्या कारखान्यात तसेच इतरत्र काम करणाऱ्या ५६ बाल कामगारांची मुंबई पोलिसांनी मंगळवारी सुटका केली. ‘प्रथम’ या स्वंयसेवी संस्थेच्या मदतीने मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने ही कारवाई केली. ताडदेव येथील तुलसीवाडी येथील कारखान्यात आणि हॉटेलमध्ये बाल कामगार काम करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मंगळावारी दुपारी छापा टाकून या मुलांची सुटका केली. या मुलांकडून काम करवून घेणाऱ्या २७ जणांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
मुलाच्या मृत्यूप्रकरणी जीवरक्षकावर गुन्हा
ठाणे : शाळेच्या सुट्टीत आजीकडे आलेल्या ऋषभकुमार वेदपाठक याच्या तरणतलावात बुडून झालेल्या मृत्यू प्रकरणी तेथील जीवरक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनोद सोनावणे असे त्याचे नाव असून तेथे उपस्थित असताना बुडणाऱ्या ऋषभला वाचवण्यात निष्काळजीपणा केल्यामुळे पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. मुळचा रोहा येथील ऋषभकुमार सुट्टीसाठी ठाण्यातील आजीकडे आला होता. गेल्या बुधवारी तो पोहण्यासाठी वसंतविहार येथील क्लब हाऊसच्या तरणतलावात उतरला. मात्र त्याचा तेथे बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तपासामध्ये या तलावाच्या परिसरात जीवनवरक्षक म्हणून काम करणाऱ्या विनोदच्या हजेरीत हा अपघात झाला होता. त्याने कुचराई केल्यामुळे सोनावणविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पहिल्या मजल्यावरून उडी मारल्याने रुग्ण जखमी
ठाणे : अंबरनाथच्या पालिका रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न करणारा रुग्ण गंभीर जखमी झाला असून त्याला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. मनोहर केंकरे (३५) असे या रुग्णाचे नाव आहे. या घटनेनंतर जखमी केंकरे यांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी रात्री केंकरे यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना पालिकेच्या डॉ. बी. जी. छाया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. केंकरे यांना दारूचे व्यसन असल्याचे रुग्णालयातील सूत्रांचे म्हणणे आहे. केंकरे यांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास पहिल्या मजल्यावरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या डोक्याला जबर मार लागला आहे.
कॅम्पाकोलावर कारवाई होणारच
मुंबई : कॅम्पाकोलावर कारवाई करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असल्याने त्यावर कारवाई करावीच लागणार आहे. मात्र ती कशी करायची तेवढेच ठरवणे बाकी आहे, असे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
कॅम्पाकोलाच्या रहिवाशांना दिलेली सहा महिन्यांची मुदत ३१ मे रोजी संपत आहे. त्यानंतर पावसाळा सुरू होत असल्याने व पावसाळ्यात घरे रिकामी करण्याची कारवाई केली जात नाही. मात्र कॅम्पाकोलाबाबत तशी समस्या नाही. ३१ मे रोजी मुदत संपली की १ वा २ जून रोजी पालिका कारवाई सुरू करेल, असे अतिरिक्त आयुक्त मोहन अडताणी यांनी स्पष्ट केले.
कॅम्पाकोलावर कारवाई करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असल्याने पालिकेला कारवाई करणे भाग असल्याचे अडताणी यांनी सांगितले.