वसरेवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो रेल्वेच्या चाचणीसाठी लखनऊच्या ‘रिसर्च डिझाइन्स अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन’ (आरडीएसओ) या भारतीय रेल्वेशी संबंधित संस्थेचे दहा जणांच्या पथकाने अवघ्या बारा दिवसांतच मेट्रोच्या चाचण्या पार पाडल्या आहेत. त्यांनी अहवालात हिरवा कंदील दाखवल्यानंतरच रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या अंतिम चाचण्यांचा मार्ग मोकळा होईल. मेट्रो रेल्वे सुरू होण्यासाठी रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे प्रमाणपत्र बंधनकारक आहे. त्याआधी ‘आरडीएसओ’च्या चाचणी परीक्षेत मेट्रो रेल्वेला यशस्वी व्हावे लागते. या पथकाच्या देखरेखीखाली ३१ जानेवारी ते २२ फेब्रुवारी या कालावधीत चाचण्यांची आखणी करण्यात आली होती. पण दहा दिवस आधीच वेगात चाचण्या पार पडल्या आणि ११ फेब्रुवारीलाच त्या संपल्या. मेट्रो रेल्वे आपल्या रुळांवरून व्यवस्थित धावते की नाही, तिचा प्रवास सुरक्षित आहे की नाही, विविध परिस्थितीत मेट्रो रेल्वेसाठी आणलेल्या गाडय़ा योग्यरित्या चालतात-थांबतात की नाही अशा चाचण्या या पथकाच्या देखरेखीखाली झाल्या.
झोपडय़ांच्या भुईभाडय़ातील ४० टक्के रक्कम सरकारला
मुंबई : झोपडपट्टय़ांचे भुईभाडे वसूल करणाऱ्या पालिकेने त्यातील सरकारचा हिस्सा बुडविल्याची बाब काँग्रेस नगरसेवकांनी उघडकीस आणली. त्यामुळे भुईभाडय़ातील ४० टक्के रक्कम राज्य सरकारला एकरकमी देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.महापालिकेतर्फे झोपडपट्टय़ांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यात येतात. त्यामुळे राज्य सरकारने झोपडपट्टय़ांचे भुईभाडे वसूल करण्याची जबाबदारी पालिकेवर सोपविली होती. मात्र भुईभाडय़ातील ४० टक्के रक्कम सरकारच्या तिजोरीत जमा करण्याचा आदेश पालिकेला देण्यात आला होता. परंतु पालिकेने एक छदामही राज्य सरकारला दिलेला नाही. स्थायी समितीच्या बैठीकीत बुधवारी या विषयावर चर्चा झाली. राज्य सरकारकडे पालिकेची प्रचंड थकबाकी असल्याची ओरड करणाऱ्या सत्ताधारी शिवसेना-भाजपला काँग्रेस नगरसेवक प्रवीण छेडा यांनी बुधवारी चपराक दिली.त्यामुळे ही रक्कम देण्याचे पालिकेने मान्य केले.
जिया खान आत्महत्या ; सूरज पांचोली न्यायालयासमोर हजर
मुंबई : अभिनेत्री जिया खान हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतर एक महिन्याने जियाचा मित्र आणि अभिनेता आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज हा बुधवारी न्यायालयासमोर हजर झाला. आरोपपत्र दाखल केल्यानंतर सूरज पहिल्यांदाच न्यायालयासमोर हजर झाला होता. लवकरच या प्रकरणी आरोप निश्चित करण्यात येऊन खटल्याचे कामकाज सुरू होईल. न्यायालयाने प्रकरणाची सुनावणी मार्चमध्ये ठेवली आहे.