मुंबई : लोकल प्रवासात रिल्सच्या नादात अनेकजण नानाविध प्रयोग करतात. काही रिल्स स्वतःचा जीव धोक्यात घालून केले जातात. तर, काही मनोरंजनात्मक असतात. परंतु, मंगळवारी विद्यार्थ्यांनी पांढरा टी-शर्ट आणि डोक्यात हेल्मेट घालून लोकल प्रवास केला. विद्यार्थी असा पवास करीत असल्याने लोकलमधील अन्य प्रवासी प्रचंड गोंधळात पडले. काही प्रवाशांनी उत्सुकतेपोटी विद्यार्थ्यांना हेल्मेट का घातले असल्याचे विचारल्यानंतर ही जनजागृती मोहीम असल्याचे उलगडले.
विद्यार्थ्यांनी हेल्मेट घालून केली जनजागृती
जागतिक मेंदू दिनानिमित्त जेव्हा संपूर्ण जगात आरोग्यदायी जीवनशैलीचा विचार करण्यात येत होता. यावेळी विद्यार्थ्यांनी थोडा वेगळा विचार करून, या दिनाचे औचित्य साधून समाज प्रबोधन केले. ‘जीवन वाचवण्यासाठी सुरक्षेचे महत्त्व’ या मुद्द्यावर विद्यार्थ्यांनी लक्ष वेधले. कल्याण ते सीएसएमटी या लोकल प्रवासादरम्यान या विद्यार्थ्यांनी अनोखी जनजागृती मोहीम राबवली. दुचाकी चालवताना होणाऱ्या अपघातांमध्ये वाढ होत आहे. त्याची तीव्रता ओळखून त्यांनी लोकलमध्ये प्रवाशांना हेल्मेट परिधान करून दुचाकीवरील प्रवास करावा, हेल्मेट वापरा, जीव वाचवा, असा संदेश प्रवाशांना दिला.
कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयाचा उपक्रम
कल्याण येथील फोर्टिस रुग्णालय आणि बी. के. बिर्ला महाविद्यालयाने ‘युवर ब्रेन मॅटर्स’ या नावाने जागतिक मेंदू दिन जागरूकता उपक्रमाचे आयोजन केले. सुमारे ५० विद्यार्थ्यांनी हेल्मेट घालून, मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांत जनजागृती केली. कल्याण, मुलुंड, वाशी, माहीम आणि सीएसएमटी या रेल्वे स्थानकात जाऊन, दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच लोकलमधील प्रवास हेल्मेट घालून केला. ही जनजागृती केवळ लोकलपुरतीच मर्यादित राहिली नाही. विद्यार्थ्यांनी सीएसएमटी स्थानकाबाहेरील रस्त्यावर, दिवसभर प्रवासी, नागरिकांबरोबर संवाद साधून त्यांना हेल्मेटचे महत्त्व पटवून दिले.
जागतिक मेंदू दिन कधी साजरा केला जातो
मेंदू हा शरीरातील अतिमहत्त्वाचा अवयव आहे. मेंदू शरीराच्या सर्व कार्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम करतो. दरवर्षी जगभरात २२ जुलै रोजी जागतिक मेंदू दिन साजरा केला जातो. सर्वप्रथम २०१४ साली जागतिक मेंदू दिवस साजरा करण्यात आला. दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पनेनुसार जागतिक मेंदू दिन साजरा केला जातो. यावर्षी ‘सर्व वयोगटातील नागरिकांसाठी मेंदूचे आरोग्य’ अशी संकल्पना होती.