मुंबई : समाजमाध्यमावरून तरुणांशी मैत्री करून त्यांना महागड्या हॉटेलमध्ये न्यायचे आणि त्यांना मोठ्या रकमेचे बिल भरायला भाग पाडायचे, असा फसवणुकीचा नवीन प्रकार सध्या सुरू आहे. एमएचबी पोलिसांनी अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून सात तरुणींसह २१ जणांना अटक केली आहे.
समाजमाध्यमावर, तसेच विविध डेटींग ॲपवर तरुण – तरुणी जोडीदाराच्या शोधात असतात. त्याचाच फायदा घेत तरुणांची फसवणूक करण्याचा एक प्रकार सध्या सुरू आहे. तरुणी समाजमाध्यमावर मुलांशी मैत्री करतात. त्यांना विशिष्ट हॉटेलमध्ये नेतात आणि महागडे ड्रिंक्स मागवून मोठ्या रकमेचे बिल भरायला भाग पडतात. यात हॉटेलचे कर्मचारीही याप्रकरणात सहभागी असतात. या फसवणुकीत मुलींना कमिशन दिले जाते. असेच एक रॅकेट एमएचबी पोलिसांनी उघडकीस आणले. याप्रकऱणात ७ मुलींसह २१ जणांना अटक करण्यात आली आहे.
अशी केली फसवणूक…
याप्रकरणी एक तक्रार एमएचबी पोलिसांकडे करण्यात आली होती. फिर्यादी तरूण २६ वर्षांचा असून तो सांताक्रुझ येथे राहतो. एप्रिल महिन्यात त्याची टिंडर ॲपवर दिशा शर्मा (२२) नावाच्या तरुणीसोबत ओळख झाली. तिने आपण बोरिवलीतील एक्सर परिसरात रहात असल्याचे सांगितले. त्यानंतर दोघे व्हॉटस ॲपवर बोलत होते. दरम्यान, त्या मुलीने फिर्यादी तरुणाला बोरिवली लिंक रोड येथील टाईम्स स्केवअर हॉटेलमध्ये भेटायला बोलावले. तेथे त्यांनी ड्रिंक्स आणि हुक्का मागवला होता. काही वेळाने त्याला ३५ हजार रुपयांचे बिल देण्यात आले. एवढ्या मोठ्या रकमेचे बिल पाहून त्याला धक्का बसला. पण एका कर्मचाऱ्याने हे बिल भरावेच लागेल असा दम दिला. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्याने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन केला. तेथे पोलीस आले आणि हॉटेल कर्मचाऱ्यांनी ५ हजार रुपये कमी करून त्याला ३० हजार रुपयांचे बिल दिले.
सदर तरुणीने त्यापैकी निम्मे १५ हजार रुपये भरते असे सांगितले. तेथील एका कर्मचाऱ्याने आपल्या मोबाइलमध्ये क्यूआर कोड दाखवून पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी तरूणाने पैसे भरले. त्या तरुणीनेही क्यूआर कोडद्वारे पैसे भरत असल्याचे भासवले. यानंतर ती तरूणी पुन्हा कधीच भेटणार नाही, असे सांगून निघून गेली.
२१ जणांना अटक
घरी आल्यावर फिर्यादी तरुणाने बिल तपासले असता त्याने भरलेले पैसे हॉटेलच्या नावाने नाही, तर मोहम्मद तालीब आणि अक्रम खान यांच्या नावावर गेल्याचे समजले. तरुणीच्या मदतीने या त्रिकुटाने त्याची फसवणूक केल्याचे लक्षात आले. अखेर त्याने याप्रकरणी एमएचबी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी तरुणी दिशा शर्मा, मोहम्मद तालीब आणि अक्रम खान यांच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६ (ड), ६६ (क) तसेच फसवणुकीप्रकऱणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१९ (२), ३१८ (४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा तपास करून रविवारी पोलिसांनी सात तरुणींसह २१ जणांना अटक केली. त्यांनी वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेऊन अनेक तरूणांची अशा प्रकारे फसवणूक केल्याचे पोलिसांनी सांगितले.