चाकूचा धाक दाखवून युवतीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीला यापूर्वी सुद्धा २०१३ साली पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी जामिनावर बाहेर आल्यानंतर आरोपीने पुन्हा पीडित महिलेचे लैंगिक शोषण केले अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि पीडित महिला शेजारी-शेजारी राहत असून २०१२ पासून ते परस्परांना ओळखतात. २०१३ साली आरोपी आणि पीडित महिला दोघांचे प्रेमसंबंध होते. आरोपीने लग्नाचे आश्वासन देऊन तिच्यावर बलात्कार केला. जेव्हा त्याने लग्नास नकार दिला तेव्हा महिलेने पोलिसात तक्रार नोंदवली. त्यावरुन आरोपीला अटक करण्यात आली अशी माहिती पोलिसांनी दिली.

काही महिन्यांपूर्वी आरोपीला जामीन मिळाला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आरोपीने पीडित महिलेला भेटण्याचा प्रयत्न केला. पण तिने नकार दिला. अखेर त्याने तिच्याघराजवळ तिला गाठले व लग्नाची मागणी घातली पण तिने नकार दिला. २५ ऑक्टोंबरला आरोपीने पुन्हा महिलेला तिच्याघराजवळ गाठण्याचा प्रयत्न केला. जेव्हा तिने नकार दिला. तेव्हा आरोपीने चाकूच्या धाकावर तिला आपल्या बाईकवर बसायला लावले. आरोपी तिला जबरदस्ती आपल्या घरी घेऊन गेला व तिच्यावर बलात्कार केला अशी माहिती पोलिसांनी दिली.