मुंबई : मराठा आंदोलनामुळे शुक्रवारी मुंबईकरांची चांगलीच कोंडी झाली. आंदोलकांच्या गर्दीमुळे महामार्ग, पूर्व मुक्त मार्ग ठप्प झाले होते. लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. आंदोलकांनी आझाद मैदान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकासह दक्षिण मुंबई परिसर व्यापून टाकला होता. त्यामुळे मुंबईकरांचे दैनंदिन व्यवहारच ठप्प झाले होते.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी निर्णायक आंदोलन सुरू केले आहे. आझाद मैदानात शुक्रवारी त्यांनी आंदोलन सुरू केले. शुक्रवारी सकाळपासून राज्याच्या कानाकोपर्यातून निघालेले आंदोलक मुंबईत दाखल झाले आणि दररोज वेगाने धावणाऱ्या मुंबईकरांचा वेगच मंदावला. या मोर्चासाठी पोलिसांनी केवळ पाच हजार आंदोलकांना परवानगी दिली होती, मात्र प्रत्यक्षात तब्बल २० ते २५ हजार आंदोलक आझाद मैदानात दाखल झाल्याने मोठा गोंधळ उडाला होता. शहराच्या मध्यभागी एवढ्या मोठ्या संख्येने आंदोलक अचानक जमा झाल्याने गोंधळ उडाला.

पूर्व मुक्त मार्ग, अटल सेतूवर कोंडी

आंदोलक सकाळी वाहनाने अटल सेतू आणि पूर्व मुक्त मार्गाने मुंबईच्या दिशेने येऊ लागले. पुढे मार्ग बंद असल्याने वाहनचालकांनी रस्त्यातच वाहने उभी केल्याने वाहतूक कोंडी झाली होती. दिवसभर पूर्व मुक्त मार्ग बंद होता. मुक्त मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

दक्षिण मुंबई ठप्प

आझाद मैदान, मुंबई महापालिका मुख्यालय परिसरातील रस्त्यावर आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनामुळे चर्चगेट, नरिमन पॉईंट आणि सीएसटीदरम्यान वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली होती. चर्चगेट आणि सीएसएमटी स्थानकातून निघालेल्या नागरिकांना बस अथवा टॅक्सी मिळत नव्हती. त्यामुळे त्यांना पायी कार्यालय गाठावे लागले. आझाद मैदान परिसरात मर्यादीत जागा असल्याने आंदोलक जागोजागी विखुरले. मग त्यांनी घोषणा देत मुंबईचा परिसर पालथा घालण्यास सुरवात केली. आंदोलक घोषणा देत, ढोल ताशे आणि हलगीच्या तालावर नृत्य करीत होते. नरिमन पॉईंट परिसरातील फेरिवाल्यांनी दुकाने बंद ठेलली होती. खाद्यपदार्थांची दुकाने, हॉटेल बंद असल्याने आंदोलकांनी मरीन ड्राईव्ह येथे काही काळ रास्ता रोको आंदोलन केले.

लोकलमध्ये प्रचंड गर्दी

मराठा आंदोलकांचे जथ्येच्या जथ्ये शुक्रवारी मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलमधून सीएसएमटी रेल्वे स्थानक गाठत होते. कसारा, कर्जतपासून पालघर, वसई-विरार येथून येणाऱ्या आंदोलकांनी लोकल ट्रेनमध्ये गर्दी केल्यामुळे सकाळी कामावर निघालेल्या कर्मचाऱ्यांना फटका बसला. लोकलमध्ये आंदोलकांची गर्दी, रस्त्यावर वाहतूक कोंडी असल्याने अनेकांना कार्यालयात पोहोचायला विलंब झाला, तर अनेकानी गर्दी, वाहतूक कोंडी पाहून कार्यालयाऐवजी घरी जाणे पसंत केले.

शनिवारीही पोलिसांची कसोटी

आंदोलनासाठी दीड हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी संयमाने आंदोलन हाताळले. ठिकठिकाणी तैनात पोलिसांनी गर्दी नियंत्रणात ठेवली. आंदोलक आक्रमक पवित्र्यात असतानाही पोलिसांनी संयमाने परिस्थिती हाताळून वाहतूक काही प्रमाणात सुरळीत केली. आंदोलनासाठी एक दिवसांची परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी आंदोलन हाताळण्याचे नियोजन केले होते. मात्र आंदोलनासाठी शुक्रवारी संध्याकाळी आणखी एक दिवसांची मुदत देण्यात आल्याने शनिवारीही पोलिसांचा कस लागणार आहे.