मुंबई : आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी ऑलिम्पियाडचे (आयओएए २०२५) १८ वे पर्व भारतात होत आहे. उद्या मंगळवार, १२ ऑगस्ट रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी आभासी पद्धतीने विविध देशातील प्रतिनिधी व विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत. त्यानंतर २१ ऑगस्ट रोजी नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर येथे समारोप सोहळा होणार आहे. पंतप्रधान कार्यालय आणि अणुऊर्जा विभागाच्या सहकार्याने टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राच्या नेतृत्वात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

जगभरातील विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या खगोलशास्त्रासंबंधित आवडीला चालना देण्यासाठी आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी ऑलिम्पियाड स्पर्धेची २००७ मध्ये थायलंडमध्ये सुरूवात झाली. या स्पर्धेमध्ये जगभरातील बारावीपर्यंतचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. सर्वप्रथम विद्यार्थ्यांचे खगोलशास्त्र आणि भौतिकशास्त्रावर आधारित सैद्धांतिक ज्ञान तपासले जाते, खगोलशास्त्रीय निरीक्षणांवर आधारित माहितीचे विश्लेषण, अवकाश निरीक्षण आणि विविध देशांतील विद्यार्थ्यांचा गट निर्माण करून एकत्रितपणे प्रश्न सोडविणे, अशा चार मुख्य या स्पर्धेत परीक्षा होतात. या विविध वैयक्तिक परीक्षा आणि नाविन्यपूर्ण सांघिक स्पर्धा यासह मुख्य शैक्षणिक कार्यक्रम पश्चिम उपनगरातच होणार आहेत.

अवकाश निरीक्षण आणि दुर्बिण हाताळण्याची क्षमता वरळीतील नेहरू तारांगण येथे तपासली जाणार आहे. स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांसाठी पवई येथे राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तर लोअर परळमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये विविध देशांचे संघ प्रमुख आणि शैक्षणिक मार्गदर्शकांसाठी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

‘खगोलशास्त्रावर प्रेम असणारे जगभरातील जिज्ञासू विद्यार्थी एकत्र यावेत, हा आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी ऑलिम्पियाडचा उद्देश आहे. या अनुषंगाने गेल्या सहा वर्षांपासून विविध देशातील विद्यार्थ्यांचा संघ तयार करून एक विशेष स्पर्धाही ऑलिम्पियाडमध्ये घेतली जाते. तसेच आपण विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या कालावधीत नारायणगावपासून १० किलोमिटरच्या अंतरावर असलेल्या जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप येथेही घेऊन जाणार आहोत’, असे ‘आयओएए’चे अध्यक्ष प्रा. अनिकेत सुळे यांनी सांगितले.

६३ देशांमधील २८८ विद्यार्थ्यांचा सहभाग

खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी ऑलिम्पियाड स्पर्धेच्या १८ व्या पर्वात ६३ देशांमधील २८८ विद्यार्थी सहभागी होणार आहेत. यामध्ये ५७ मुली आणि २३१ मुलांचा समावेश आहे. प्रत्येक देशाचे कमाल ५ विद्यार्थी सहभागी होऊ शकतात, याप्रमाणे भारताकडूनही ५ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. तसेच घाना देशातील शिक्षक सदर ऑलिम्पियाड स्पर्धेला उपस्थित राहून निरीक्षण करणार असून पुढील वर्षी सहभागी होण्यासाठी नेमकी काय तयारी करावी लागेल? यासंदर्भातील माहिती जाणून घेणार आहेत. तसेच १२ देश पहिल्यांदाच सहभागी होत आहेत. पहिल्यांदा सहभागी होणाऱ्या देशांच्या यादीत अल्जेरिया, इथियोपिया, घाना, फ्रान्स, इटली, पॅलेस्टाईन, ऑस्ट्रेलिया आदी देशांचा समावेश आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानची माघार

मुंबईत होणाऱ्या १८ व्या खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी ऑलिम्पियाड स्पर्धेत पाकिस्तानचे विद्यार्थीही सहभागी होणार होते. मात्र पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत – पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. त्यानंतर ऑलिम्पियाड समितीकडूनही पाकिस्तानच्या संघाला भारतातील लोकभावनेबद्दल सांगण्यात आले. त्यामुळे कोणताही वाद निर्माण होऊ नये आणि सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानने स्पर्धेतून माघार घेतली.