मुंबई : मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या इसमावर कारवाई केल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांनाच मारहाण केल्याचा प्रकार कांदिवलीत घडला आहे. याप्रकरणी समता नगर पोलिसांनी ३ महिलांसह पाच जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

सध्या गणेशोत्सव सुरू असून कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. समतानगर पोलिसांचे एक पथक आणि वाहतूक पोलीस मंगळवार, २ सप्टेंबर रोजी रात्री कांदिवलीतील बिग बाजार परिसरात बंदोबस्तावर होते. वाहतूक पोलीस वाहनचालकांची तपासणी करीत होते. मध्यरात्री १२.४५ च्या सुमारास एका वाहनचालकाने मद्यप्राशन केल्याचे पोलीस शिपाई सुरवाळे यांना आढळले. त्याचे नाव अजय बामणे होते. पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करण्यास सुरवात केली.

पोलिसांना मारहाण

वाहनात आरोपी अजय बामणेचे नातेवाईक होते. गणेश बामणे, तसेच विद्या सोनावणे, विजया भट आणि वर्षा बामणे या तीन महिलांनी पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. अजयविरुद्ध कारवाई करू नये म्हणून त्यांनी पोलिसांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. तसेच पोलीस हवालदार सिद्धार्थ किणी, महिला पोलीस उपनिरीक्षक गरड, महिला शिपाई तांडले यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. महिला उपनिरीक्षक गरडे यांना नखाने ओरबाडून कारवाई करू नये यासाठी वाद घालून सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

या प्रकाराने तिथे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच समतानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी पोलिसांशी हुज्जत घालून धक्काबुक्की करणारे अजय बामणे आणि गणेश बामणे या दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.

पाच जणांविरोधात गुन्हा, दोघांना अटक

याप्रकरणी पोलीस हवालदार सिद्धार्थ किणी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पाच जणांविरुद्ध पोलिसांशी हुज्जत घालून धक्काबुक्की करणे, मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. अजय बामणे आणि गणेश बामणे या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आले. या गुन्ह्यातील अन्य आरोपी विजया भट, वर्षा बामणे आणि विद्या सोनावणे यांनाही लवकरच अटक केली जाईल, असे समता नगर पोलिसांनी सांगितले.