अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.रोहित गर्ग नावाच्या एका तरूणाने सलमान खानच्या जवळच्या सहकाऱ्याला ई मेल पाठवून ही धमकी दिली आहे. या ई-मेलमध्ये तुरुंगात असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या अलीकडच्या मुलाखतीचा संदर्भ आहे. लॉरेन्स बिश्नोईने मुलाखातीत हा दावा केला होता की, "सलमान खानला ठार करणं हेच माझ्या आयुष्याचं ध्येय आहे." ही धमकी आल्यानंतर आता मुंबई पोलिसांनी महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. मुंबई पोलिसांनी काय उचललं पाऊल? मुंबईतल्या वांद्रे पोलिसांनी या प्रकरणी कलम ५०६ (२), १२० (ब) आणि ३४ या अन्वये प्रकरण दाखल केलं आहे. तसंच धमकीचा हा मेल सलमान खानच्या सहकाऱ्याला आल्यानंतर पोलिसांनी सलमान खानच्या घराभोवतीची सुरक्षा वाढवली आहे. मुंबई पोलिसांनी सलमान खानला Y+ सुरक्षा प्रदान केली आहे, कारण त्याचा जीव धोक्यात आहे. अभिनेता सलमान खानला याआधीही अशा प्रकारची धमकी आली होती. त्यावेळीच महाराष्ट्र सरकारने हे पाऊल उचललं. आता पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेऊन प्रकरण दाखल केलं आहे. तसंच सलमान खानच्या घराभोवतीची सुरक्षाही वाढवली आहे. सलमान खानला आलेल्या धमकीच्या ई-मेलमध्ये काय म्हटलं आहे? सलमान खानचा जवळचा सहकारी प्रशांत गुंजाळकर याला शनिवारी धमकीचा ई-मेल पाठवण्यात आला. मेल पाठवणाऱ्या तरुणाचं नाव रोहित गर्ग असल्याची माहिती समोर येत आहे. सलमान खानच्या टीमने संशयित आरोपी रोहित गर्ग, गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. सलमान खानच्या टीमने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी रोहित गर्गने ई-मेलमध्ये लिहिलं की, कुख्यात गुंड गोल्डी ब्रारला सलमान खानशी बोलायचं आहे. यामध्ये नुकत्याच झालेल्या लॉरेन्स बिश्नोईच्या मुलाखतीचाही संदर्भ देण्यात आला आहे. ज्यामध्ये लॉरेन्स बिश्नोई याने सलमान खानला मारणं हे त्याच्या आयुष्याचं ध्येय असल्याचं म्हटलं होतं. “गोल्डी ब्रारला तुमच्या बॉसशी (सलमान खान) बोलायचे आहे. त्याने गँगस्टर बिष्णोईची मुलाखत नक्कीच पाहिली असेल. जर सलमानने ती मुलाखत पाहिली नसेल तर त्याला ती पाहायला सांगा. जर हे प्रकरण कायमचं बंद करायचं असेल तर सलमान खानला गोल्डी ब्रारशी बोलू द्या. त्यांना समोरासमोर बोलायचं असेल तर तसं कळवा. यावेळी आम्ही तुम्हाला वेळेवर कळवलं आहे. पुढच्या वेळी थेट धक्का देऊ” असा मजकूर पत्रात लिहिला आहे.