मुंबई : मुंबई पोलिसांनी गेल्यावर्षी सोलापूर येथील मेफेड्रोनच्या (एमडी) कारखान्यावर केलेल्या कारवाईत २५६ कोटी रुपयांचे मेफेड्रोन (एमडी) जप्त केले होते. या प्रकरणातील फरार आरोपी कुब्बावाला मुस्तफा याला युनायटेड अरब अमिराती (यूएई) येथून भारतात आणण्यात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) इंटरपोल विभागाला यश आले आहे. आरोपीविरोधात रेड कॉर्नर नोटीस देण्यात आली होती. त्याच्या आधारे त्याला अबुधाबीमध्ये पकडण्यात आले होते.

सीबीआयच्या इंटरनॅशनल पोलीस कोऑपरेशन विभागाने अबूधाबी येथील नॅशनल सेंट्रल ब्युरोच्या मदतीने ही कारवाई केली. कुब्बावाला मुस्तफा याला शुक्रवारी दुबईहून विमानाने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणण्यात आले. त्यासाठी मुंबई पोलीस दलातील चार पोलिसांचे पथक दुबईला गेले होते. इंटरपोलमार्फत केलेल्या सततच्या पाठपुराव्यानंतर त्याला यूएईमध्ये शोधून काढण्यात आले होते. कुर्ला परिसरातून गुन्हे शाखेच्या कक्ष-७ च्या पोलिसांनी १५ फेब्रुवारी,२०२४ रोजी एका महिलेला ६४१ ग्रॅम एमडीसह पकडले होते. त्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने मिरा रोड येथे छापा टाकून तीन किलो एमडी जप्त केले होते.

त्यावेळी मिळालेल्या माहितीच्या आधारे महिन्याभरानंतर सांगलीतील कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी या गावतील शिवारात एमडी निर्मितीच्या कारखानावर छापा टाकला होता. यावेळी १२६ किलो एमडी जप्त करण्यात आला होते. या कारवाईत आतापर्यंत ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यातील तिघांना गुजरातमधून अटक करण्यात आली होती. त्यावेळी चौकशीत हा कारखाना कुब्बावाला चालवत असल्याचे निष्पन्न झाले होते, असा आरोप आहे. त्यानंतर त्याचा शोध घेण्यात आला, पण आरोपी परदेशात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. मुंबई पोलिसांनी केलेल्या विनंतीनुसार इंटरपोलने २५ नोव्हेंबर २०२४ रोजी कुब्बावाला विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अबुधाबी येथील नॅशनल सेंट्रल ब्युरो या यंत्रणेने त्याला १९ जून रोजी पकडले. त्यानंतर मुंबई पोलिसांनी परराष्ट्र मंत्रालय आणि गृह मंत्रालय यांच्यामार्फत यूएईकडे प्रत्यर्पणाची अधिकृत मागणी केली होती. आरोपीला शुक्रवारी भारतात आणण्यात आले. या प्रकरणात कुब्बावाला मुस्तफा याच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले असून अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे. इंटरपोलमार्फत प्रसिद्ध होणाऱ्या रेड कॉर्नर नोटीस सर्व देशांतील यंत्रणांना दिल्या जातात. सीबीआय ‘भारतपोल’च्या माध्यमातून देशांतर्गत समन्वय साधते. गेल्या काही वर्षांत अशा प्रकारे १०० हून अधिक फरार गुन्हेगारांना भारतात परत आणण्यात यश आले आहे.