मुंबई : हास्य अभिनेता कपिल शर्मा याच्या कॅनडा येथील कॅफेवर झालेल्या गोळीबारानंतर मुंबई पोलिसांनी समांतर तपास सुरू केला आहे. ओशिवरा पोलिसांचे एक पथक शुक्रवारी कपिल शर्माच्या निवासस्थानी चौकशीसाठी गेले होते.
कॉमेडियन कपिल शर्मा आणि त्याची पत्नी गिन्नी या दोघांनी कॅनडात नुकताच एक कॅफे सुरू केला होता. न्यूटन भागातील १२० स्ट्रीटवर असलेल्या कॅफेवर गुरुवारी सकाळी गोळीबार करण्यात आला होता. कॅफेच्या काचांवर गोळीबार करण्यात आला. त्यावेळी कॅफेमध्ये कर्मचारी उपस्थित होते. या हल्ल्यात कुणीही जखमी झाले नाही, मात्र कॅफेचे मोठे नुकसान झाले. खलिस्तानवादी हरदिप सिंग उर्फ लड्डी याने या गोळीबाराची जबाबदारी घेतली आहे.
गोळीबाराच्या या घटनेमुळे बॉलीवूडमध्ये पडसाद उमटले आहेत. अभिनेता सलमान खानला आलेल्या धमक्या, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी हे प्रकरण गांभिर्याने घेतले आहे. त्यामुळे या गोळीबाराचा समांतर तपास करण्या येत असल्याचे मुंबई पोलीस दलातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांचे पथक शुक्रवारी अंधेरीतील कपिल शर्मा याच्या निवासस्थानी गेले होते. कपिल शर्माचा जबाब नोंदविण्यात येणार आहे.