मुंबई : परिमंडळ ११ च्या पोलीस उपायुक्तांनी अमली पदार्थ विरोधात दोन दिवसांची विशेष मोहीम राबविली. या मोहिमत साडेचार लाखांचे एमडी आणि गांजा जप्त करण्यात आला असून याप्रकरणी अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली. याशिवाय अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या २१ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
परिमंडळ ११ चे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांच्या विशेष पथकाने अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात ही मोहीम राबविली. शनिवार ३० जून आणि रविवारी १ जून असे दोन दिवस ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत परिडमंडळातील पोलीस ठाण्याचे अधिकारी सहभागी झाले होते. गस्तीदरम्यान एमएचबी पोलीस ठाण्याच्या हद्दीतूून एका महिलेस अटक करण्यात आली. तिच्याकडून ४ लाख २४ हजार रुपये किंमतीचे ५३ ग्रॅम एमडी (मॅफेड्रॉन) हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले.
पोलिसांनी मालवणी, गोरेगाव, चाककोप आणि एमएचबी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठिकठिकाणी छापे घातले. या कारवाईत ९९३ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी एकूण ४ जणांना अटक करण्यात आली. याशिवाय मालवणी, चारकोप, मालाड, बांगूर नगर, एमएचबी कॉलनी, बोरिवली, कांदिवली येथे छापे टाकून अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या २१ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.
सलग दोन दिवस ही कारवाई करण्यात आली. यात सव्वाचार लाख रुपयांचे ५३ ग्रॅम मॅफेड्रॉन (एमडी), २७ हजार रुपयांचा गांजा जप्त कऱण्यात आला. अंमली पदार्थांची तस्कारी करणाऱ्या पाच तस्करांना अटक करण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली. यापुढेही अशा प्रकारची कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी महाविद्यालय आणि शाळांच्या परिसरात साध्या वेषातील गस्ती पथकही तैनात केले आहे.
परिमंडळ ११ चे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप विश्वासराव (गोरेगाव), वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर (मालवणी) वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश पवार (एमएचबी) वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण (चारकोप) यांच्या मार्गदर्शनाखालील पथकांनी ही कारवाई केली केली.
तक्रार करण्याचे आवाहन
शहरात अमली पदार्थांच्या तस्करीचे प्रमाण वाढले आहे. ते रोखण्यासाठी पोलीस आणि अमली पदार्थ विभाग सक्रिय झाले आहेत. नागरिकांना याप्रकरणात तक्रार करण्यासाठी मदतवाहिनी सेवा सुरू करण्यात आली आहे. अमली पदार्थांशी संबंधित कुठलीही तक्रार असल्यास व्हॉट्स ॲप क्रमांक ८७९६७५४०२९ वर संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.