लैंगिक अत्याचार झाल्यास महिलांना तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात येण्याची गरज नाही. महिलांसाठीच्या हेल्पलाइनवर फोन करून त्या तक्रार नोंदवू शकतात. तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले हरवल्याची तक्रार कोणत्याही पोलीस ठाण्यात दाखल करता येईल. ही तक्रार त्यानंतर संबंधित पोलीस ठाण्याकडे वर्ग केली जाऊ शकेल, अशी घोषणा मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी बुधवारी केली.
कार्यभार स्वीकारल्यानंतर राकेश मारिया यांनी रस्त्यांवरील गुन्हेगारीला आळा घालण्याबरोबरच महिला सुरक्षेला प्राधान्य दिले जाईल, असे घोषित केले होते. त्याचाच प्रत्यय देत मारिया यांनी बुधवारी ही घोषणा केली. लैंगिक अत्याचारास बळी पडलेली महिला १०३ या हेल्पलाइनवर फोन करून महिला पोलीस कर्मचाऱ्यांना घडल्या प्रकाराबाबत माहिती देऊ शकेल. त्यानंतर महिला पोलीस कर्मचारी या महिलेच्या घरी जाऊन रितसर तक्रार नोंदवून घेईल, असे मारिया यांनी सांगितले.
महिला, लहान मुले किंवा ज्येष्ठ नागरिक हरवल्याची घटना घडल्यास त्यांचे नातेवाईक जवळच्या कोणत्याही पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवू शकतात. पोलीस ठाण्याच्या हद्दीचा प्रश्न उभा राहिल्यास संबंधित कागदपत्रे योग्य पोलीस ठाण्याकडे पाठवली जातील. त्याचप्रमाणे महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांनी केलेल्या तक्रारींची दखल घेण्यासाठी विशेष डेस्कची स्थापना करण्यात येईल, असेही मारिया म्हणाले.
मुलींच्या शाळा, महाविद्यालये, रेल्वे स्थानकाकडे जाणारे रस्ते, देवळांकडे जाणारे रस्ते या ठिकाणी महिला पोलीस  सातत्याने गस्त घालतील. ‘मॉर्निग वॉक’च्या ठिकाणांवरही पोलिसांची गस्त वाढवण्यात येईल. सोनसाखळी चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत, असे मारिया यांनी सांगितले.