मुंबई : दिवाळीनिमित्त एकीकडे खरेदीची लगबग सुरू असतानाच मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी कंदील लावण्याची राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागल्याचे निदर्शनास आले. मुंबई महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी दिवाळीनिमित्त शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यंदा अनेक ठिकाणी भाजप, तसेच ठाकरे बंधूचे एकत्र छायाचित्र असलेले कंदील लक्षवेधी ठरत आहेत. तर काही ठिकाणी शिवसेनेचे (शिंदे) कंदीलही दिसत आहेत.
दिवाळीनिमित्त नागरिकांना शुभेच्छा देणारे राजकीय फलक ठिकठिकाणी झळकू लागले आहेत. यातच मुंबईत राजकीय पक्षांनी ठिकठिकाणी भलेमोठे राजकीय कंदील लावले आहेत. कंदील लावण्याची स्पर्धाच राजकीय पक्षांमध्ये सुरू असल्याचे दिसून आले. राजकीय पक्षांमध्ये पडणारी फूट, सत्ताबदल, विभागामध्ये राजकीय वर्चस्वासाठी सुरू असलेली लढाई या सगळ्याचा परिमाण राजकीय कंदिलांवरही दिसत आहे. हे राजकीय कंदील लक्षवेधी ठरत असून राजकीय फलक आणि कंदील चर्चेचा विषय बनला आहे.
दिवाळीत इतर सजावटी सोबतच कंदिलांचे प्रमुख आकर्षण असते. घराच्या दारात ते अगदी चौकात लावलेला भलामोठा कंदील सर्वांचे लक्ष वेधून घेतो. यासाठी राजकीय पक्षांकडून प्रचार करण्यासाठी कंदिलांचा वापर केला जातो. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. तसेच दिवाळीनिमित्त उटणे, फराळ, दिवे आणि रांगोळीचे वाटप करून विविध माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून मुख्य रस्त्यांवर, बाजारात आणि चौकाचौकात आकाश कंदील लावण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये स्पर्धाच लागली आहे. दरवर्षी अशा राजकीय कंदिलांना मोठी मागणी असते. यंदाही आम्ही मोठ्या प्रमाणवर असे कंदील तयार केले आहेत. यात भाजपाच्या कंदिलांची संख्या जास्त आहे. तर शिवेसना (ठाकरे), शिवेसना (शिंदे) आणि मनसेकडून कंदिलाला मोठी मागणी आहे, असे घाटकोपर येथील कंदिलाचे व्यापारी नितीन खोपकर यांनी सांगितले. खोपकर हे गेल्या वीस वर्षांपासून राजकीय कंदील तयार करीत आहेत.
गेल्यावर्षी ऐन दिवाळीत विधानसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागली. त्यामुळे राजकीय पक्षांना कंदिलाच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करता आले नाही. यंदा अनेक ठिकाणी राजकीय पक्ष कंदिलांच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करीत आहेत. गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने बाजी मारत सत्ता स्थापन केली होती. यामुळे यंदा भाजपाचे कंदील सर्वत्र झळकताना दिसत आहे. तर शिवेसनेनेही (शिंदे) कंदिलांच्या माध्यमातून प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवेसनेने (ठाकरे) मोठ्या प्रमाणावर कंदील लावले असून काही ठिकाणच्या कंदिलांवर ठाकरे बंधूंचे एकत्र छायाचित्र झळकले आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मात्र याबाबत हात आखडता घेतल्याचे चित्र आहे.
दादरमध्ये कंदिलावर ठाकरे बंधूचे छायाचित्र
दादरमध्ये अनेक ठिकाणी लावण्यात आलेल्या कंदिलावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांचे एकत्र छायाचित्र पाहायला मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटी होत आहेत. दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयोजित करण्यात आलेल्या दीपोत्सवाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. आता कंदिलावरही ठाकरे बंधू एकत्र झळकल्याने आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकीत शिवसेना (ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना युती करणार अशी चर्चा रंगली आहे.
