मुंबई : स्थानिक रहिवासी आणि पर्यावरणविषयक संस्थांतील कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून मुंबई महानगरपालिकेने पवई तलावाच्या स्वच्छतेसाठी मोठा प्रकल्प हाती घेतला आहे. पवई तलावात सोडण्यात येणारे गटाराचे पाणी रोखण्यासाठी सांडपाणी वाहिनी टाकण्याचे काम आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी स्वतंत्र निविदा काढण्यात आल्या असून यापैकी सांडपाणी पाहिनी टाकण्याचे काम स्वस्तिक कन्स्ट्रक्शन्सना देण्यात आले आहे.
मुंबईतील पवई तलावात दररोज १८ दशलक्ष लिटर प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडण्यात येत असल्याने पर्यावरणप्रेमींनी चिंता व्यक्त करीत याबाबत पंतप्रधान कार्यालयाच्या सार्वजनिक तक्रार संकेतस्थळावर तक्रार दाखल केली होती. या तक्रारीला त्वरित प्रतिसाद देत केंद्राने राज्य पर्यावरण विभागाला कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. पवई तलावामध्ये १८ दशलक्ष लिटर सांडपाणी सोडण्यात येत असल्याचे मुंबई महानगरपालिकेने काही दिवसांपूर्वी सांगितले होते.
दरम्यान, दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर पालिकेने पवई तलावात सोडण्यात येणारे गटाराचे पाणी रोखण्यासाठी सांडपाणी वाहिनी टाकण्याचे काम आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी स्वतंत्र निविदा काढल्या. यापैकी सांडपाणी वाहिनी टाकण्याबाबतच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून हे काम स्वस्तिक कन्स्ट्रक्शन्स कंपनीला देण्यात आले आहे. तर, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या कामासाठी अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. सांडपाणी वाहिनी टाकण्याचे काम २१ जुलै रोजी सुरू करण्यात येणार असून हे काम १८ महिन्यांच्या पूर्ण करावे लागणार आहे.
‘सेव्ह पवई लेक’ विशेष मोहीम
काही दिवसांपूर्वी पवई येथील स्थानिक रहिवासी आणि पर्यावरणप्रेमींनी पवई तालाव स्वच्छ करण्यासाठी आणि तलाव जलपर्णीमुक्त करण्यासाठी ‘सेव्ह पवई लेक’ ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान, पवई तालावातील जलपर्णीचा वेढा रोखण्यासाठी तालावातील सांडपाण्याच्या वाहिन्या अन्यत्र वळवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला होता. याचबरोबर तलावातील जलपर्णीही काढण्यात येत होती. तलावात दररोज प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडले जात असल्याबाबत स्थानिक रहिवासी, तसेच पर्यावरणप्रेमींनी खंत व्यक्त केली होती. जोपर्यंत तलावात सोडण्यात येणारे सांडपाणी बंद होत नाही, तोपर्यंत हा लढा सुरू राहील, असा निर्धार पर्यावरणप्रेमींनी केला आहे.
उशीरा का होईना तलावाची स्वच्छता होईल हे महत्त्वाचे. आता लवकरात लवकर महापालिकेने हे काम सुरू करावे. – पामेला चीमा, स्थानिक रहिवासी, पर्यावरणप्रेमी
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
तलाव जलपर्णीमुक्त करण्यास महापालिकेने उचलले पाऊल महत्त्वाचे आहे. महापालिकेच्या या निर्णयामुळे तलाव स्वच्छ आणि जलपर्णीमुक्त होईल अशी अपेक्षा आहे. – बी. एन. कुमार, संचालक, नॅटकनेक्ट फाउंडेशन