…म्हणून रात्री बारानंतरही मुंबई, ठाण्यातील काही भागांमध्ये वीज नव्हती; उर्जा मंत्र्यांनी दिली माहिती

रात्री सव्वा बाराच्या सुमारास दिली माहिती

(संग्रहित छायाचित्र)

महापारेषणच्या पडघा उपकेंद्रातील उच्चदाब वीज वाहिनीतील बिघाडामुळे सोमवारी मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगडमधील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला. रेल्वे, रस्ते वाहतुकीसह दैनंदिन व्यवहारांना मोठा फटका बसल्याने मुंबई, ठाणे परिसरात जनजीवन विस्कळीत झाले. महापारेषणने दुरुस्तीचे काम हाती घेतले, पंरतु सायंकाळपर्यंत सुमारे ६०-७० टक्के भागांतच वीजपुरवठा सुरू होऊ शकला. यात प्रामुख्याने रेल्वे आणि रुग्णालयांचा वीजपुरवठा प्राधान्याने सुरू करण्यात आला.

रात्री उशिरापर्यंत मुंबई, ठाणे, नवी मुंबई आदी विविध ठिकाणी अनेक भागांत विजेअभावी लाखो लोकांचे हाल झाले. दुपारी १ च्या सुमारास हळूहळू वीजपुरवठा सुरळीत होण्यास सुरुवात झाली, पंरतु रात्री उशिरापर्यंत अनेक भागांत वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येत होता. मात्र मुलुंड, ठाण्यातील काही भागांमध्ये रात्रभर वीज नव्हती. मुलुंड, ठाण्यामागील अनेक भागांमध्ये १४ तासांपासून अधिक काळ वीज पुरवठा खंडित होता. यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधिंनीही नारजी व्यक्त केली.

मुलुंड, ठाण्यातील काही भाग रात्रभर अंधारात राहण्यामागील मुख्य कारणासंदर्भात उर्जा मंत्री नितीन राऊत यांनीच ट्विटरवरुन रात्री पावणे दहा वाजता माहिती दिली. राऊत यांनी केलेल्या ट्विटमध्ये, “टाटाचे ५०० मेगावॅटचे सिक्रोनायझेशन होऊ शकलेले नाही. मुलुंड, ठाणे, नवी मुंबईतील काही भागांमध्ये वीजपुरवठा सुरळीत झालेले नाही. मात्र रात्री दहापर्यंत तो होईल. सध्या मुंबईतील २१०० मेगावॅट गरज पूर्ण केली जात आहे,” असं म्हटलं होतं. मात्र हा बिघाड रात्री उशीरा ठीक न झाल्याने अनेक भागांमध्ये रात्रभर वीज पुरवठा खंडीतच होता.

त्यानंतर सव्वाबाराच्या सुमारास राऊत यांनी पुन्हा एकदा ट्विट करुन माहिती देताना आहे. युद्धपातळीवर काम सुरु असल्याचे सांगितले. “आमचे कर्मचारी मुलुंड, ठाणे, नवी मुंबई आणि मालाडमधील काही भागांमध्ये खंडित असणारा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहेत. टाटाकडून वीज निर्मीती सुरु झाली आहे. मी स्वत: या कामावर लक्ष ठेऊन आले. तासाभरामध्ये सर्वकाही सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.

राऊत यांनी हे ट्विट करण्याआधीच म्हणजे रात्री पावणे बारापासून ठाणे, मुलुंड, नवी मुंबई आणि मालाडमधील उर्वरित ठिकाणी वीज पुरवठा पुन्हा सुरळीत होण्यास सुरुवात झाली. मध्य रात्रीनंतर अनेक ठिकाणी वीज आली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mumbai power cut this is why power could not restored in some part of mulund thane new mumbai malad say nitin raut scsg

ताज्या बातम्या