Electric Vehicle Charging Stations On Mumbai Pune Expressway: मुंबई: राज्यात विद्युत वाहनांचा वापर वाढविण्यासाठी विद्युत वाहनांना पथकर माफी देण्यात आली असून मुंबई-पुणे महामार्गावरही विद्युत वाहनांना पथकर माफी लागू झाली आहे. त्यामुळे आता या महामार्गावरुन धावणाऱ्या विद्युत वाहनांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. तेव्हा वाढत्या वाहनांना महामार्गावर चार्जिंगची सुविधा उपलब्ध करुन देणेही गरजेचे झाले आहे. सध्या महामार्गावर ५ चार्जिंग स्टेशन असून ती अपुरी असल्याने आता महामार्गावर २० चार्जिंग स्टेशन वाढविण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) घेतला आहे. त्यानुसार जागेचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण सुरु असून मार्च २०२६ पर्यंत नवीन २० चार्जिंग स्टेशन कार्यान्वित करण्याचे एमएसआरडीसीने नियोजन आहे.
वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी, हवामान बदल कमी करण्यासाठी तसेच खनिज तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी विद्युत वाहनांचा वापर वाढविण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. त्यासाठी विद्युत वाहन धोरण लागू करण्यात आले असून त्याअंतर्गत मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, अटल सेतू आणि नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर विद्युत वाहनांना १०० टक्के पथकर माफी १५ आॅगस्टपासून लागू करण्यात आली आहे. पथकर माफी लागू करतानाच धोरणात महामार्गांवर विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन वाढविण्याची तरतूदही करण्यात आली आहे. त्यानुसार एमएसआरडीसीने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर २० अतिरिक्त चार्जिंग स्टेशन उभारण्याचा नि्र्णय घेतल्याची माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. सध्या महामार्गावर पाच विद्युत वाहने चार्जिंग स्टेशन आहेत. उर्से आणि खालापूर येथील पेट्रोल पंपावर डेल्टा, टाटा पाॅवर, एक्सीकाॅमसह अन्य एका कंपनीकडून चार्जिंग स्टेशन चालविली जात आहेत. विद्युत वाहनांना १५ आॅगस्टपासून विद्युत वाहनांना पथकर माफी दिल्याने भविष्यात विद्युत वाहनांची संख्या वाढणार आहे. पर्यायाने महामार्गावरुन धावणाऱ्या विद्युत वाहनांच्या संख्येतही वाढ होणार आहे. वाढत्या वाहन संख्येला चार्जिंगसाठी पुरेशा सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. त्यामुळे चार्जिंग स्टेशन वाढविण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
महामार्गावरील पुण्याच्या दिशेने आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकांवरील पेट्रोल पंपांवर २० नवीन चार्जिंग स्टेशन सुरु करण्यात येणार आहेत. त्यासाठी जागेचा शोध सुरु आहे. जागा निश्चित करून लवकरच चार्जिंग स्टेशन उभी करण्यात येतील. खासगी कंपन्यांच्या माध्यमातून ती चालवली जाणार आहेत. तर मार्च २०२६ पर्यंत नवीन २० चार्जिंग स्टेशनवरील सुविधा सुरु करण्याचे नियोजन असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.