Mumbai-Pune Expressway Crash Caught On Dashcam : मुंबई-पुणे महामार्गावरील एका भीषण अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत दिसतंय की एकामागोमागे एक अनेक गाड्यांनी एकमेकांना धडक दिली आहे. यामध्ये कार आणि मोठ्या ट्रेलर्सचा समावेश आहे. एकाच वेळी इतक्या गाड्यांचा अपघात होऊन अर्धा रस्ता बंद झाला होता. या अपघातामुळे महामार्गावर बराच वेळ कोंडी निर्माण झाली देखील झाली होती. या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

खंडाळा घाटात मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एका ट्रेलरने काही वाहनांना धडक दिली. यापैकी काही वाहनं त्यांच्या पुढच्या वाहनांना जाऊन धडकली. परिणामी एका मागोमाग एक १५ ते १६ वाहनांचा अपघात झाला. दरम्यान, एका कारच्या डॅशकॅमने अपघाताचं चित्रण केलं आहे. धडकी भरवणारा अपघाताचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

शनिवारी ( २६ जुलै) दुपारी आडोशी बोगद्याजवळ एका भरधाव ट्रेलर ट्रकच्या चालकाने वाहनावरील नियंत्रण गमावलं आणि या ट्रेलरने अनेक वाहनांना धडक दिली. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला आहे. पोलिसांनी या अपघाताची माहिती देताना सांगितलं की ब्रेक फेल झाल्यामुळे ट्रेलर चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि हा ट्रेल बीएमडब्ल्यू, मर्सिडीजसारख्या लग्झरी गाड्यांना धडकला.

ट्रेलरची दिड किलोमीटरच्या पट्ट्यात अनेक वाहनांना धडक

ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचं ट्रेलरवरील नियंत्रण सुटलं आणि ट्रेलर रस्त्यावर त्याच्या मार्गातील वाहनांना धडक देत पुढे जात राहिला. १.५ ते २ किलोमीटरच्या पट्ट्यात या ट्रेलरने एकामागून एक अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातात छोट्या वाहनांचं प्रचंड नुकसान झालं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपघातात एका महिलेचा मृत्यू

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रेक फेल झाल्यामुळे ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले आणि तो बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज सारख्या लक्झरी गाड्यांवर आदळला. या अपघातात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. या अपघातात २० जण जखमी झाले असून त्यांना नवी मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एका जखमी महिलेचा रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. अपघातानंतर पुण्यावरून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक ठप्प झाली होती. काही तासांनी बचाव पथकांनी व पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरू झाली.