मुंबई : रेल्वे स्थानके, रूळ अशा रेल्वेच्या परिसरात मृत्यू झालेल्या १४ हजार नागरिकांची ओळख अद्याप पटलेली नाही. रेल्वे परिसरात २०१४ ते २०२४ या १० वर्षात ४४ हजार ६८२ जणांचा मृत्यू झाला होता. मात्र त्यातील जवळपास १४ हजार मृतांच्या नातेवाईकांचा शोध रेल्वे पोलिस घेत आहेत. रेल्वेच्या उपनगरीय लोकल रेल्वे मधून दररोज लाखो प्रवासी ये-जा करत असतात. वाढत्या गर्दीबरोबर अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे. रुळ ओलांडताना, ट्रेन मधून पडून अनेकांना जीव गमवावा लागतो. आत्महत्या आणि नैसर्गिक कारणांमुळे अनेकांचे रेल्वे परिसरात मृत्यू होत असतात.

गेल्या दहा वर्षांत म्हणजेच २०१४ ते २०२४ या कालावधीत ४४ हजार ६८२ जणांचे विविध अपघातात मृत्यू झाला. या आकडेवारीनुसार दिवसाला सरासरी ७ जणांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता. परंतु त्यातील १३ हजार ९४० मृतदेहांची अद्याप ओळख पटलेली नाही. त्यात पश्चिम रेल्वेच्या हद्दीतील ५ हजार ५२४ आणि मध्य रेल्वेच्या हद्दीतील ८ हजार ४१६ मृतदेहांचा समावेश आहे. सामाजिक कार्यकर्ते डॉ संतोष मेहता यांनी माहिती अधिकारात ही आकडेवारी रेल्वे पोलिसांकडून मिळाली आहे. या बेवारस मृतदेहांची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान रेल्वे पोलिसांपुढे आहे.

रेल्वे परिसरात आढळलेल्या मृतांची त्यांच्या खिशात आणि समानात असलेले ओळखपत्र, इतर कागदपत्रे आणि मोबाईलद्वारे ओळख पटवून मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द केले जातात. मात्र अनेक मृतदेहांची ओळख पटविण्यात अपयश येते. अशा मृतदेहांची छायाचित्रे काढून सर्व राज्यातील पोलीस ठाण्यात पाठविण्यात येतात तसेच त्यांची माहिती संकेतस्थळावर टाकली जाते. दहा दिवस हा मृतदेह शवागरात ठेवण्यात येतो. त्यानंतरही कुणी वारस न आल्यास मृतदेहाचे केस, नख आदींचे नमुने घेऊन डिएनए जतन केला जातो. नशेबाज, भिक्षेकरी आदींचे मृतदेहांची ओळख पटविण्यात सर्वाधिक अडचणी येत असल्याचे रेल्वे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

बेवारस मृतांच्या वारसांचा शोध घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते समीर झवेरी यांनी जनहित याचिका दाखल केल्यानंतर रेल्वे पोलिसांनी २०१२ मध्ये शोध नावाचे संकेतस्थळ सुरू केले होते. या संकेतस्थळावर बेवारस मृतदेहांची माहिती टाकून त्यांच्या वारसांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात येतो. मात्र हे संकेतस्थळ कुचकामी असून वारसांचा त्यातून योग्य माहिती मिळत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ संतोष मेहता यांनी केला आहे.

२०१४ ते २०२४ या १० वर्षातील आकडेवारी

एकूण मृत्यू- ४४ हजार ६८२

पश्चिम रेल्वे – २५ हजार ८४६

मध्य रेल्वे- १८ हजार ८३६

ओळख न पटलेले

पश्चिम रेल्वे- ८ हजार ४१४

मध्य रेल्वे- ५ हजार ५२४

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकूण- १३ हजार ९४०