मध रेल्वे : तीन एक्स्प्रेस गाडय़ा रद्द; काही गाडय़ांच्या वेळेत बदल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्य रेल्वेच्या हद्दीतील फाटक ओलांडताना होणारे अपघात आणि त्यामुळे रेल्वे सेवेवर होणारा परिणाम टाळण्यासाठी पूलउभारणी करण्यात येणार असून, त्यासाठी रविवारी तब्बल सहा तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉग काळात ठाकुर्ली स्थानकाजवळील फाटक बंद करून तेथे उभारण्यात येणाऱ्या पुलाच्या गर्डरचे काम करण्यात येणार आहे. तर अंबरनाथ- बदलापूरदरम्यानच्या पुलाची तांत्रिक दुरुस्ती करण्यात येणार आहे. या कामांमुळे रविवारी मुंबईत येणाऱ्या पुणे-सीएसटी डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, मनमाड-सीएसटी पंचवटी एक्स्प्रेस, मनमाड-एलटीटी गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. काही एक्स्प्रेस रेल्वे गाडय़ा कल्याण स्थानकात, तर काही दिवा स्थानकात थांबविण्यात येणार आहेत. नागपूरहून येणारी सेवाग्राम एक्स्प्रेस नाशिक रोडवरच थांबविण्यात येणार आहे.

लांब पल्ल्याच्या गाडय़ा विलंबाने

हावडा-मुंबई एक्स्प्रेस, राजेंद्रनगर-एलटीटी एक्स्प्रेस, गोरखपूर-सीएसटी एक्स्प्रेस, अहालाबाद-एलटीटी विशेष ट्रेन, वाराणसी-एलटीटी एक्स्प्रेस, जालना-दादर जनशताब्दी एक्स्प्रेस, हटिया-एलटीटी एक्स्प्रेस, वाराणसी-सीएसटी महानगरी एक्स्प्रेस, अलाहाबाद-एलटीटी द्रुतगती मार्गावर एक्स्प्रेस, पाटलीपुत्र-एलटीटी एक्स्प्रेस या गाडय़ा उशिराने धावणार आहेत. डाऊन मार्गावरील या मेल-एक्स्प्रेस गाडय़ांना दिवा स्थानकात थांबा देण्यात येणार आहे. यामध्ये सीएसटी-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस, सीएसटी-नागरकोविल एक्स्प्रेस, एलटीटी-ककीनाडा पोर्ट, सीएसटी-हैदराबाद एक्स्प्रेसचा समावेश आहे.

अंबरनाथ-बदलापूरदरम्यान सेवा बंद

चिखलोली गावाजवळ रेल्वे रुळाखालील नाला अरुंद झाल्याने पावसाळ्यात मोठय़ा प्रमाणावर पाणी साठून त्याचा दाब रेल्वे रुळावर असायचा. त्यामुळे येथील नाल्याचे रुंदीकरण करण्यासाठी रविवार, २५ जून रोजी सकाळी ९ ते २ वाजेपर्यंत रेल्वे सेवा बंद करण्यात येणार आहे. या वेळी रेल्वे रूळ काढून तेथे नाल्याचे काम केले जाणार आहे. त्यामुळे अंबरनाथ ते बदलापूरदरम्यानची पूर्ण रेल्वे वाहतूक बंद राहणार आहे. अंबरनाथ आणि बदलापूरदरम्यानची रेल्वे सेवा यामुळे पूर्णत: ठप्प होणार आहे. त्यामुळे कर्जत ते बदलापूपर्यंतच्या प्रवाशांचा मुंबई प्रवास खडतर होणार आहे, तर या काळात बदलापूर ते कर्जत-खोपोली रेल्वे सेवा सुरू राहणार असून अंबरनाथ ते कल्याण सेवा सुरू राहणार आहे. मात्र बदलापूर ते अंबरनाथ हा प्रवास रेल्वे वा बसमार्फत प्रवाशांना करावा लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांची तारांबळ होणार आहे. सलग दोन दिवसांच्या सुट्टय़ांचा आनंद घेण्याच्या विचारात असलेल्या पर्यटकांचाही या प्रकारामुळे भ्रमनिरास होणार आहे.

कल्याण-डोंबिवलीदरम्यान ब्लॉक

ठाकुर्ली स्थानकातील पुलासाठी चार गर्डर टाकण्यासाठी डोंबिवली ते कल्याण दरम्यान सहा तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळी ९.१५ ते दुपारी ३.१५, अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ९.१५ ते दुपारी १२.४५ वाजेपर्यंत, तर ५-६व्या रेल्वे मार्गावर सकाळी ९.१५ ते दुपारी ३.१५ वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे.

  • सीएसटी ते अंबरनाथ, सीएसटी ते कसारा, आसनगाव आणि टिटवाळ्याकरिता डाऊन जलद मार्गावरील वाहतूक दुपारी १२, अप जलद मार्गावरील वाहतूक दुपारी १२.४५ नंतर सुरू होणार आहे.
  • ब्लॉकदरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसटी-डोंबिवली-सीएसटी, सीएसटी-ठाणे-सीएसटी, कल्याण-कसारा, आसनगाव, टिटवाळा-कल्याण, कल्याण-अंबरनाथ-कल्याण विशेष गाडय़ा चालविण्यात येणार आहे.
  • कर्जत-खोपोली लोकल वेळापत्रकानुसार धावणार आहेत. रविवारी मुंबईत येणाऱ्या पुणे-सीएसटी डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, मनमाड-सीएसटी पंचवटी एक्स्प्रेस, मनमाड-एलटीटी गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. १२१४० नागपूर-सीएसटी सेवाग्राम एक्स्प्रेस रविवारी नाशिक रोडपर्यंतच चालविण्यात येणार असून तेथूनच नागपूरसाठी रवाना करण्यात येणार आहे.

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai railway mega block
First published on: 25-06-2017 at 01:19 IST