मुंबई : मध्य रेल्वेवरून विनातिकीट प्रवाशांची संख्या वाढत असून या प्रवाशांची धरपकड सुरू आहे. त्यासाठी विविध तिकीट तपासणी मोहिमा राबविण्यात येत आहेत. मध्य रेल्वेच्या महिला तिकीट तपासनीस रुबिना अकिब इनामदार यांनी अलिकडेच एका दिवसात १५० विनातिकीट प्रवाशांना पकडून ४५ हजार ७०५ रुपये दंड वसूल करून विक्रमी कामगिरी केली होती. मात्र त्यानंतर अवघ्या चार दिवसांतच महिला तिकीट तपासनीस सुधा द्विवेदी यांनी एकाच दिवसात २०२ विनातिकीट प्रवाशांना पकडून ५५ हजार २१० रुपये दंड वसूल करून नवा विक्रम केला.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात दररोज १,८१० लोकल सेवा धावतात. या लोकलमधून सुमारे ३९ लाख प्रवासी प्रवास करतात. तसेच मध्य रेल्वेवरून दररोज ६६ वातानुकूलित लोकल धावतात. यामधून दररोज सुमारे ७६ हजार ८३६ प्रवासी प्रवास करतात. परंतु, अनेक प्रवासी वातानुकूलित लोकलमधून विनातिकीट प्रवास करतात. तर, काही प्रवासी सामान्य लोकलच्या प्रथम अथवा द्वितीय श्रेणीचे तिकीट घेऊन वातानुकूलित लोकलमधून प्रवास करतात. अशा प्रवाशांमुळे तिकीटधारक प्रवाशांचा प्रवास गैरसोयीचा होतो. विनातिकीट प्रवाशांचा शोध घेऊन, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रोखण्यासाठी, तिकीटधारक प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायक प्रवास करता यावा यासाठी वारंवार तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. विशेषत: वातानुकूलित लोकल आणि स्थानकांवर तिकीट तपासणी मोहिमा राबवून चालू आर्थिक वर्षात जानेवारी २०२५ पर्यंत ८१ हजार ७०९ विनातिकीट प्रवाशांची धरपकड करण्यात आली. त्यांच्याकडून २ कोटी ७० लाख रुपये दंड वसूल करण्यात आला.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात २८ फेब्रुवारी २०२५ रोजी या एका दिवसात सर्वाधिक दंड वसूल करण्यात प्रवासी तिकीट निरीक्षक सुधा द्विवेदी यांना यश आले. त्यांनी एकाच दिवसात २०२ विनातिकीट प्रवाशांची धरपकड करून ५५ हजार २१० रुपये दंड वसूल करून नवा विक्रम नोंदविला. तेजस्विनी पथक २ च्या प्रवासी तिकीट निरीक्षक रुबिना अकिब इनामदार यांनी याआधी २४ फेब्रुवारी २०२५ रोजी एकाच दिवसात १५० विनातिकीट प्रवाशांना पकडून ४५ हजार ७०५ रुपये दंड वसूल करून विक्रमी कामगिरी केली होती. सुधा द्विवेदी यांनी २८ फेब्रुवारी रोजी नवा विक्रम केला, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रवासी तिकीट निरीक्षक सुधा द्विवेदी यांची २२ मे १९९३ रोजी रेल्वेमध्ये नियुक्ती झाली. सुरुवातीला विद्युत विभागात नियुक्तीनंतर उद्घोषक म्हणून त्यांनी काम केले. त्या २००६ मध्ये तिकीट तपासणीस विभागात दाखल झाल्या. तिकीट तपासनीस पथकात २०१३ सालापासून सहभागी झाल्यानंतर त्यांनी नवनवीन विक्रम करण्यास सुरुवात केली. १६ सप्टेंबर २०२४ रोजी त्यांनी ९४ विनातिकीट प्रकरणांतून २६ हजार ६६० रुपये दंड वसूल केला. त्यानंतर २२ ऑक्टोबर २०२४ रोजी १०३ विनातिकीट प्रकरणांतून २९ हजार १६५ रुपये दंड वसूल केला. तर, २९ ऑक्टोबर रोजी १२९ विनातिकीट प्रवाशांना पकडून ३५ हजार ५५० रुपये दंड वसूल केला होता. गेल्यावर्षी त्यांना अति विशिष्ट रेल सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. रेल्वे मंत्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे.