मुंबई : मुंबईत गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेली संततधार बुधवारीही कायम होती. पालिकेच्या पर्जन्यमापन यंत्रावरील आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार मुंबई आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ४३.५८ टक्के पाऊस झाला आहे. दरम्यान बुधवारी सोसाटय़ाच्या वाऱ्यासह पाऊस मध्यम आणि मुसळधार झाला. दिवसभर अधूनमधून प्रतितास ४५-५५ किमी वेगाने वारे वाहिले. अशीच परिस्थिती गुरुवारी कायम राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाच्या कुलाबा केंद्राने वर्तवली आहे. दादरमध्ये दिवसभरातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली. पावसामुळे सखल भागात विशेषत: पूर्व उपनगरांत अनेक ठिकाणी पाणी साचले.
मुंबईत बुधवारी पहाटेपासून सोसाटय़ाच्या वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. दुपारी पावणेबारा वाजता भरतीची वेळ असताना मुंबईत मुसळधार पाऊसही सुरू होता. यावेळी समुद्रात ४.६८ मीटर उंचीच्या लाटा उसळत होत्या. दिवसभरात सर्वाधिक पाऊस शहर भागात कोसळला. त्याखालोखाल पूर्व आणि पश्चिम उपनगरात पाऊस पडला. दुपारी काहीशी विश्रांती घेऊन पावसाच्या सरी पुन्हा सुरू झाल्या. यंदाच्या पावसाळय़ात आतापर्यंत शहर भागात वार्षिक सरासरीच्या ४५ टक्के पाऊस झाला आहे तर उपनगरात ४० टक्के पाऊस झाला आहे.
येत्या दोन दिवस मुंबई शहर आणि उपनगरांत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. अधूनमधून ४५-५५ किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहतील, असा अंदाज कुलाबा केंद्राने वर्तवला आहे. येत्या दोन दिवसांसाठी मुंबई, संपूर्ण कोकणासह राज्यात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पालघर, नाशिक, पुणे या जिल्ह्यांना १४ जुलैपर्यंत धोक्याचा इशारा आणि मुंबईला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, पुढील तीन दिवस अशीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. ओडिशाच्या बाजूने कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कायम आहे. त्यामुळे मुसळधार पाऊस पडेल, असे मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. जयंत सरकार यांनी सांगितले. सखल भागात पाणी साचले.
पर्जन्यमारा..
कुठे, किती पाऊस?
- दादर ११२ मिमी
- वडाळा १०१ मिमी
- सीएसटी परिसर ९९ मिमी
- वरळी ९९ मिमी
- वांद्रे ८४ मिमी
- विक्रोळी ८३ मिमी
- चेंबूर ८२ मिमी
- मरोळ ७८ मिमी
- भांडूप ७५ मिमी
- देवनार ७१ मिमी
- चेंबूर ६९ मिमी
- सक्कर पंचायत वडाळा, दादर टीटी, शेख मिस्त्री दर्गा रोड अॅण्टॉप हिल, सायन रोड नं. २४, अंधेरी सबवे येथे पाणी साचले. दादर पूर्व परिसरात मात्र खूप पाऊस पडूनही हिंदूमाता परिसरात यावेळी तुलनेने कमी पाणी साचले होते.
- अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला होता. रस्त्यांवर दोन फुटांपर्यंत पाणी साचल्याने येथील मार्ग बंद करण्यात आले आहेत. वाहनधारकांसाठी पर्यायी मार्गावरून प्रवास करण्याच्या सूचना वाहतूक पोलीस विभागाने दिल्या. लोकल रेल्वे गाडय़ाही उशिरा धावत होत्या.
- दिवसभरात ८६ ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या. शहरात २६, पूर्व उपनगरांत १७ व पश्चिम उपनगरांत २५ ठिकाणी झाडे व फांद्या मोडून पडल्या. मरीन ड्राईव्ह येथे समुद्र फळाचे झाड वाऱ्यामुळे उन्मळून पडले. पालिकेच्या उद्यान विभागाने माती खणून हे झाड त्याच ठिकाणी तात्काळ पुनरेपित केले तर शिवडी येथील सुदरजी लीलाधर चाळ, टी जे रोड येथे रस्त्यात एक झाड उन्मळून पडले. उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांनी तासभरात हे झाड तोडून रस्ता मोकळा केला.
पवईमध्ये भिंत कोसळली : पवई येथील हिरानंदानी रुग्णालयाच्या मागे असलेल्या डोंगराच्या संरक्षक भिंतीचा काही भाग बाजूला असलेल्या घरावर पडला. बुधवारी सकाळी नऊ वाजता ही दुर्घटना घडली. सुरक्षिततेचा उपाय म्हणून ७ घरे रिकामी करण्यात आली. नागरिकांची निवासाची व्यवस्था पालिकेच्या तिरंदाज शाळेत आणि नजिकच्या गुरुद्वारामध्ये करण्यात आली होती.