मुंबई : मंगळवारच्या पावसात मिठी नदीची पाण्याची पातळी वाढल्यामुळे वांद्रे ते अंधेरी भागात अनेक ठिकाणी जलमय परिस्थिती निर्माण झाली होती. मुंबईला पाणी पुरवठा करणारा विहार तलाव सोमवारी काठोकाठ भरल्यानंतर त्याचे ओसंडून जाणारे पाणी मिठी नदीला येऊन मिळत असल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली होती. विहार तलावाचा हा सांडवा वळवण्याचे काम मुंबई महापालिकेने हाती घेतले असले तरी त्याला अजून दोन तीन वर्षे लागणार आहेत. मात्र तोपर्यंत मिठी नदीला पूर येण्याचा धोका कायम आहे.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी मुंबईच्या लगत असलेला विहार तलाव सोमवारच्या पावसाने काठोकाठ भरून वाहू लागला. सात पैकी सहा तलाव काठोकाठ भरल्यामुळे मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास टाकला असला तरी विहार तलाव पूर्णपणे भरल्यामुळे मंगळवारच्या अतिवृष्टीच्यावेळी मिठीनदीची पातळी वाढली. विहार तलावातून ओसंडून वाहणारे पाणी हे मिठी नदीत येते. मिठी नदीचा उगम हा विहार तलावातूनच होतो. पावसाळ्यात अतिवृष्टी व समुद्राची भरती यांच्या एकत्रित परिणामामुळे मिठी नदी ओसंडून वाहत असते. त्यातच विहार तलाव भरल्यास मिठी नदीची पाणी पातळी वाढते. त्यामुळे मिठी नदी लगतचा कुर्ला, क्रांतीनगर, बीकेसी, वांद्रे आणि साकीनाका, अंधेरीपर्यंतचा काही भाग पाण्याखाली जातो. या भागात पूरस्थिती उद्भवते. या परिसरातील रेल्वे रुळांवरही पाणी साचते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जिवित व वित्तहानी होते. त्यावर उपाय शोधण्यासाठी मुंबई महापालिकेने अभ्यास करून विहार तलावाचा ओसंडून वाहणारा सांडवा भांडूप संकुलात वळवण्याचे ठरवले आहे.

विहार तलावातून ओसंडून वाहणारे पाणी वाया जाऊ देण्यापेक्षा ते भांडूप संकुल येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात आणून त्यावर जलशुद्धीकरण करून ते पाणी पिण्याच्या कामासाठी वापर करण्याचा मुंबई महापालिकेचा विचार आहे. त्याकरीता जुलै २०२४ मध्ये कार्यादेशही देण्यात आले आहेत. तसेच या कामासाठी चालू आर्थिक वर्षात ४० कोटींची तरतूदही करण्यात आली आहे. मात्र हे काम पूर्ण होण्यास अजून दोन तीन वर्ष लागणार असल्याची माहिती पालिकेच्या पाणी पुरवठा प्रकल्प विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. या कामासाठी विहार तलाव ते भांडूप संकुलापर्यंत पाणी वाहून नेणारे जलवाहिन्यांचे जाळे तयार करावे लागणार आहे. त्याला सुमारे एक ते दीड वर्ष लागू शकते. संपूर्ण प्रकल्प पूण होण्यास दोन ते तीन वर्षे लागू शकतात.

विहार तलाव हा मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी एक आहे. विहार तलावाची पाणी साठवण्याची क्षमता ही २,७६९.८ कोटी लीटर (२७,६९८ दशलक्ष लीटर) एवढी आहे. मुंबईच्या एकूण पाणीपुरवठ्यापैकी दोन टक्के पाणी हे या तलावातून घेतले जाते. हा तलाव आकाराने लहान असून तो दरवर्षी जुलै महिन्यातच भरतो. यंदा मात्र जुलै महिन्यात पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे तलाव ऑगस्ट महिन्यात भरला आहे.