मुंबई : मुंबईत दाखल झालेल्या पहिल्याच मोसमी पावसाने मुंबईची तुंबई केली. या पावसामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. दरम्यान, मुंबई शहर आणि दोन्ही उपनगरात पडझडीसह शॉर्ट सर्किटच्या शंभरहून अधिक घटना घडल्या. त्यात झाडाची भलीमोठी फांदी व झाड कोसळून दोनजण जखमी झाले. त्यातील तेजस नायडू (२६) या तरुणाचा दुर्घटनेत मृत्यू झाला.

मुसळधार पावसामुळे सोमवारी मुंबई शहरात ४६, पूर्व उपनगरात ४, तर पश्चिम उपनगरात १० अशा एकूण ५३ ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या. सुदैवाने या दुर्घटनांमध्ये कोणीही जखमी झाले नाही. तसेच, तातडीने संबंधित ठिकाणी प्रशासनातर्फे मदतकार्य पोहोचवून परिस्थिती आटोक्यात आणण्यात आली. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे शहरात ४६, पूर्व उपनगरात ७ आणि पश्चिम उपनगरात १७ मिळून एकूण ७० ठिकाणी झाडे, फांद्या पडल्याच्या घटना घडल्या.

सीएसएमटी येथील सेंट झेवियर्स महाविद्यालयानजीक दुपारी दीडच्या सुमारास झाडाची फांदी पडून साईराज पवार (२४) हा जखमी झाली. त्याला तातडीने सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सद्यस्थितीत त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. विक्रोळी पूर्वेकडील कन्नमवार नगरातील गणेश मैदानात सोमवारी रात्री ८ वाजता एक झाड उन्मळून पडले. या दुर्घटनेत तेजस नायडू (२६) हा तरुण गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला नजीकच्या गोदरेज रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. महापालिकेच्या उद्यान खात्यातर्फे संबंधित झाडाची छाटणी पूर्वीच करण्यात आली होती. मात्र, झाडाची मुळे कुजल्यामुळे झाड पडल्याचा दावा पालिकेने केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शहरात ६, पूर्व उपनगरात ३ आणि पश्चिम उपनगरात ३ अशा एकूण १२ ठिकाणी घराचा भाग, इमारतीचा भाग, भिंत पडण्याच्या दुर्घटना घडल्या. माहीम येथील कँडल रोडवरील सनसेट हॉटेलनजीक म्हाडाच्या उपकरप्राप्त २ माजली इमारतीच्या दादराचा भाग कोसळला. त्यात अडकलेल्या २ स्थानिक रहिवाशांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले. तसेच, वाळकेश्वर येथेही सोमवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास एका इमारतीची संरक्षक भिंत कोसळली. या दुर्घटनांमध्ये कोणीही जखमी झाल्याची नोंद नसली तरीही मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.