मुंबई : रविवारी मध्यरात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक मार्गांवर पाणी असून अनेक भागातील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुसळधार पावसामुळे अंधेरी भुयारी मार्ग, दादर टीटी परिसर, वीरा देसाई मार्ग, खार भुयारी मार्ग जलमय झाल्याने येथील वाहतूक संथ गतीने सुरू असून संबंधित भागात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावरही निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी झाले आहेत.
रविवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर कायम असून अनेक सखल भाग जलमय होण्यास सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून वांद्रे, सांताक्रुझ, किंग्ज सर्कल आदी विविध भागात पाणी साचले आहे. कार्यालयात जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नोकरदार वर्गाला मोठी कसरत करावी लागत आहे. प्रभादेवी रेल्वे स्थानक , तसेच कुर्ला रेल्वे स्थानक परिसरातील मार्ग पाण्याखाली गेला आहे. वाकोला येथील खार भुयारी मार्गात अर्धा फूट पाणी साचले आहे.
पानबाई स्कुल नॉर्थ बाउंड स्लिप रोड या ठिकाणी एक फूट पाणी साठलेले असल्याने वाहतूक संथ गतीने सुरू आहे. अंधेरी भुयारी मार्गातही पावसाचे पाणी साचल्याने तेथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तेथील गोखले पुल मार्गे वळविण्यात आली आहे. दादर टीटी सर्कल येथे अर्धा फूट ते एक फूट पाणी साचल्याने वाहतूक संथ गतीने सुरू आहे.अंधेरीतील सरोटा पाडा भागात देखील पाणी साचले असून नागरिकांची गैरसोय होऊ लागली आहे. तसेच, वीरा देसाई मार्गही पाण्याखाली गेला वाहतूकदारांना ताटकळत प्रवास करावा लागत आहे.
बोरिवलीतील दत्तापाडा मार्गावरील उड्डाणपुलावरही प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. दरम्यान, आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी किंवा अधिकृत माहितीसाठी महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या १९१६ या संपर्क क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.