तब्बल तीन ते चार तासानंतर सीएसएमटीवरून कल्याण आणि पनवेलपर्यंतची वाहतूक सुरळीत झाली आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे उपनगरीय वाहतूक सेवेवर परिणाम झाला होता. ऐन गर्दीच्यावेळी वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे चाकरमान्यांचे मेगाहाल झाले होते.

मुंबईतील कुर्ला स्थानकाजवळ सिग्नलमध्ये बिघाड झाला होता तर कुर्ला ते सायन दरम्यान रुळांवर पाणी साठल्यामुळे मध्यरेल्वे पूर्णपणे ठप्प झाली होती. तर मानखुर्द स्टेशनजवळ पुलाचा स्लॅब पडल्यामुळे हार्बर रेल्वेही विस्कळीत झाली होती. सुरूवातीला वाशी ते पनवेल मार्गावर वाहतूक सुरू होती. आता सीएसएमटी ते वाशी वाहतूक सुरू झाली आहे.

मध्य रेल्वेवरील सिग्नल यंत्रणेतील बिघाडाचा फटका लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही बसला. पुण्याकडे जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रद्द कऱण्यात आल्या होत्या. सीएसएमटीकडून निघणारी चेन्नई एक्सप्रेस विद्याविहार आणि कुर्ला स्थानकादरम्यान थांबून होती.


शुक्रवार रात्रीपासूनच मुंबईत पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. त्यामुळे आज सकाळपासून तिन्ही मार्गांवरची लोकल सेवा विस्कळीत झाली होती. दुपारी २ च्या सुमारास कुर्ला स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड झाली. शिवाय ठाणे आणि सायन येथेही रेल्वेरुळावर पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. हार्बर मार्गावर चुनाभट्टी आणि वडाळा येथे रेल्वे रुळावर प्रचंड पाणी साचल्याने हार्बर सेवाही ठप्प झाली होती. बेस्ट प्रशासनाने पुरेश्या बसेस न सोडल्याने येथेही प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. मंत्रालय, वरळी, नवी मुंबईकडे जाणाऱ्या बसेसला तुडुंब गर्दी झाली होती.