मुंबई : मुंबईत अलिकडच कोसळलेल्या मुसळधार पावसात प्रवाशांची आर्थिक लूट केल्याच्या आरोपाखाली परिवहन विभागाने ॲप आधारित टॅक्सी ॲग्रीगेटर्सवर कारवाई सुरू केली आहे. गेल्या दोन दिवसांत, १४७ ॲप आधारित टॅक्सी ऑपरेटर्सवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. मुंबई महानगरात कोसळलेल्या पावसामुळे रस्ते वाहतूक विस्कळीत झाली होती. या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन प्रवाशांकडून जास्त भाडे आकारल्याबद्दल ३६ जण दोषी आढळले आहेत.

ॲप आधारित टॅक्सी सेवेकडून प्रचंड आर्थिक लुबाडणूक करण्यात येत असल्याच्या तक्रारी परिवहन विभागाकडे करण्यात आल्या आहेत. या तक्रारींची दखल घेत प्रवाशांची आर्थिक लूट करणाऱ्या ॲप आधारिक संस्थावर कडक कारवाई करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला दिले. नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीत अशा प्रकारे प्रवाशांचे आर्थिक शोषण खपवून घेतले जाणार नाही. वारंवार उल्लंघन करणाऱ्या ऑपरेटर्सचे परवाने रद्द करावे, असे निर्देश सरनाईक यांनी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

अव्वाच्या सव्वा भाडे वसूल

अतिवृष्टीमुळे मुंबई व उपनगरातील अनेक ठिकाणी बस व लोकल रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन ॲप आधारित टॅक्सी सेवा देणाऱ्या संस्थांनी प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे वसूल केले. जिथे नियमित भाडे २०० रुपयांच्या आसपास होते, तिथे या संस्थांनी प्रवाशांकडून ६०० ते ८०० रुपये भाडे घेतले.

सायबर सेल डिजिटल मॅनिप्युलेशनची चौकशी करणार

सरनाईक यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याशी चर्चा करून पोलिसांच्या सायबर सेलकडून अवैधरित्या भाडे आकारणी करणाऱ्या ॲप आधारित टॅक्सी सेवेवर कारवाई कराव्यात, अशी सूचना केली. त्यानुसार मुंबई व उपनगरात अनेक ठिकाणी मोटार परिवहन विभाग व पोलीस प्रशासनाने मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे. मुंबई पोलीस सायबर सेलला डिजिटल फेरफार आणि ॲप ऑपरेटरद्वारे वापरल्या जाणाऱ्या वाढीव किंमतीच्या अल्गोरिदमची चौकशी करण्याचे निर्देश सरनाईक यांनी दिले.

येत्या काळात पावसामुळे वाहतूक विस्कळीत झाल्यानंतर ॲप आधारित टॅक्सी संस्थांनी जादा भाडे आकारणी केल्यास, प्रवाशांनी त्यासंदर्भात समाज माध्यमांद्वारे तक्रार करावी. जेणेकरून जास्त भाडे आकारणाऱ्या प्रत्येक ॲग्रीगेटरवर कडक कारवाई करणे सोयीचे होईल. जलद कारवाई आणि अधिक पारदर्शक कारभार यातून दिसून येईल, असे सरनाईक यांनी सांगितले. दरम्यान गेल्या दोन दिवसात आरटीओने सुमारे १४७ ॲप आधारित टॅक्सी सेवेवर कारवाई केली. त्यापैकी ३६ टॅक्सी सेवांनी प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारणी केली होती.