मुंबई : स्वच्छ सर्वेक्षणात यंदा मुंबई शहराला ३३ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. गेल्यावर्षी स्वच्छ शहरांमध्ये मुंबई शहराचा क्रमांक ३७ वा होता. त्यात यंदा किंचित सुधारणा झाली आहे. कचरामुक्त शहरांसाठी असलेल्या गुणांमध्ये मुंबईला शून्य मार्क मिळालेले आहेत. देशातील श्रीमंत महानगरपालिका म्हणून ख्याती असलेल्या मुंबई महानगरपालिकेला पहिल्या दहा क्रमांकामध्ये येण्यास बराच मोठा पल्ला गाठावा लागणार आहे.

केंद्र सरकारतर्फे राबवण्यात आलेल्या वार्षिक स्वच्छ सर्वेक्षणात (२०२४-२५) मुंबई शहराला ३३ वा क्रमांक मिळाला आहे. मुंबईला आतापर्यंत कधीही पहिल्या दहामध्ये क्रमांक पटकावता आलेला नाही. देशातील स्वच्छ शहरांच्या यादीत मुंबईचा क्रमांक खूप खाली आहे. मात्र गेल्या काही वर्षात त्यात प्रगती होत असल्याचे आढळून आले आहे. नागरिकांचे अभिप्राय आणि प्रत्यक्ष पाहणीच्या आधारे हे क्रमांक दिले जातात. आंतरराष्ट्रीय शहर अशी ख्याती असलेल्या मुंबई शहराला स्वच्छ सर्वेक्षणात यंदाही वाईट गुण मिळाले आहेत. घरोघरी कचरा संकलन आणि कचरा विलगीकरण यामधील गुण मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी मिळाले आहेत.

मुंबईचा सगळा कचरा हा देवनार, कांजूरमार्ग येथील कचराभूमीवर नेऊन टाकला जातो. या जुन्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आलेल्या अपयशामुळेही मुंबई महापालिकेचा क्रमांक घसरला आहे. कांजूरमार्ग व देवनार येथील कचराभूमी बंद करण्यात आलेले अपयश, जुन्या कचऱ्याच्या व्यवस्थापनात आलेले अपयश यामुळेही हा क्रमांक घसरला आहे. तसेच कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याकरीता प्रकल्प न उभारल्यामुळेही मुंबई महापालिकेला गुण मिळू शकलेले नाहीत. त्याचबरोबर कचरा शुल्क वसूल न करणे, सांडपाण्यावर प्रक्रिया न करता पाणी समुद्रात सोडणे या गोष्टींमुळेही गुण कमी होतात.

दरम्यान, मुंबई महापालिकेने सध्या मुलुंड कचराभूमीवरील साठलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावून जमीन परत मिळवण्यासाठी बायोमायनिंगचा प्रकल्प राबवला आहे. या प्रकल्पाचे सुमारे ६० टक्के काम झाले आहे. तर देवनार येथील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तसाच प्रकल्प लावण्याकरीता निविदा प्रक्रिया सुरू आहे. तसेच देवनार येथे कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्पही लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे येत्या काळात मुंबईला स्वच्छ सर्वेक्षणात चांगला क्रमांक मिळेल असा विश्वास पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. तसेच मुंबई महापालिकेने सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सात ठिकाणी प्रकल्प उभारण्याचे कामही हाती घेतले आहेत.

सहा हजार कोटींची तरतूद

घनकचरा व्यवस्थापन विभागाचा अर्थसंकल्प हा एखाद्या लहानशा महापालिकेच्या पूर्ण अर्थसंकल्पाइतका आहे. दरवर्षी सुमारे तीन हजार कोटींपेक्षा जास्तीची तरतूद घनकचरा विभागासाठी केली जाते. चालू आर्थिक वर्षात ६०६४ कोटींची तरतूद घनकचरा व्यवस्थापन विभागासाठी केलेली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईचा व्याप मोठा …..

सुमारे ४७५ चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या मुंबई महानगरात दीड कोटीहून अधिक लोकसंख्या वास्तव्यास आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये जवळपास दोन हजार किलोमीटर लांबीचे रस्ते समाविष्ट आहेत. त्यासोबत मुंबई महानगराला लागून असलेल्या इतर शहरांमधून दररोज नोकरी-व्यवसाय निमित्ताने कोट्यवधी नागरिक ये-जा करतात. ही सर्व व्याप्ती लक्षात घेतली तर दैनंदिन घनकचरा व्यवस्थापन करण्याचे अवाढव्य लक्ष्य महानगरपालिका प्रशासनासमोर असते. वार्षिक सरासरी सुमारे ६ हजार १०० मेट्रिक टन घनकचऱ्याचे व्यवस्थापन मुंबईत केले जाते.

असा होता मुंबईचा स्वच्छ सर्वेक्षणातील क्रमांक

वर्ष क्रमांक
२०२४-२५ ३३
२०२३ -२४ ३७
२०२२-२३ ३१
२०२१-२२२९