मुंबई : रविवारी पहाटेपासून कोसळत असलेल्या संततधारांचा जोर सायंकाळी कमी झाला. त्यांनतर पुन्हा मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. रविवारी सकाळी ८ ते सोमवारी सकाळी ८ या २४ तासांच्या कालावधीत महापालिकेच्या स्वयंचलित पर्जन्यमापकानुसार १४ ठिकाणी १०० मिमी हून अधिक पावसाची नोंद झाली. सर्वाधिक १४२ मिमी पाऊस दहिसरमधील तरे मनपा शाळा या ठिकाणी नोंदला गेला.

गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून कोसळणाऱ्या पावसाचा शनिवारी मध्यरात्रीपासून जोर वाढला. रविवारी सायंकाळी पावसाचा जोर कमी झाला. मुंबईत रविवारी सकाळी ८ ते सायंकाळी ६ या १० तासांच्या कालावधीत तीन ठिकाणी १०० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली. शनिवारी सकाळी पावसाने विश्रांती घेतली असली तरीही रविवारी सकाळी ८ ते सोमवारी सकाळी ८ या २४ तासांच्या कालावधीत मुंबईत पावसाने थैमान घातले होते.

हवामान विभागाच्या सांताक्रुझ केंद्रात ७७.५ मिमी, तर कुलाबा केंद्रात १०१.२ मिमी पाऊस नोंदला गेला. तसेच, महापालिकेच्या स्वयंचलित पर्जन्यमापकानुसार, शहरात ७४.८५ मिमी, पश्चिम उपनगरात ९९.४४ मिमी आणि पूर्व उपनगरात ७७.८९ मिमी पावसाची नोंद झाली. २४ तासांत सर्वाधिक म्हणजेच १४२ मिमी पाऊस पश्चिम उपनगरातील दहिसरमधील तरे मनपा शाळा येथे बरसला. त्याखालोखाल बोरिवली अग्निशमन केंद्र येथे १४१, दिंडोशी अग्निशमन केंद्र येथे १४० आणि मागाठाणे बस आगार येथे १३९ मिमी पाऊस नोंदला गेला.

दरम्यान, मुसळधार पावसामुळे शहर व दोन्ही उपनगरात पडझडीच्याही घटना घडल्या. शहरात १, पश्चिम उपनगरात १ अशा दोन ठिकाणी झाड, झाडाची फांदी पडल्याच्या घटना घडल्या. तसेच, शहरात १ व पूर्व उपनगरात २ ठिकाणी घर, भिंत, घराचा भाग पडल्याच्या घटना घडल्या. त्यांनतर महापालिकेने संबंधित विभागांना कळवून मदतकार्य हाती घेतले. दरम्यान, शहरात ४, पूर्व उपनगरात ३, पश्चिम उपनगरात ४ अशा एकूण ११ ठिकाणी शॉर्ट सर्किट झाले. सुदैवाने या दुर्घटनांमध्ये कोणीही जखमी झाले नाही.

२४ तासांत सर्वाधिक पाऊस नोंद झालेली ठिकाणे (नोंदी मिलिमीटरमध्ये)

  • भायखळा अग्निशमन केंद्र – ११६
  • कुलाबा अग्निशमन केंद्र – १११
  • फ्रॉसबेरी रिझरवायर – १०५
  • एफ नॉर्थ विभाग कार्यालय – १०१
  • कुलाबा पंपिंग स्टेशन – ९९
  • पासपोली मनपा शाळा – १२१
  • टी विभाग कार्यालय – १२१
  • एमसीएमसीआर पवई – १२१
  • मुलुंड अग्निशमन केंद्र – १२०
  • एलबीएस मार्ग मनपा शाळा, मुलुंड – १२०
  • तरे मनपा शाळा, दहिसर – १४२
  • बोरिवली अग्निशमन केंद्र – १४१
  • आर मध्य विभाग कार्यालय – १४१
  • दिंडोशी अग्निशमन केंद्र – १४०
  • मागाठाणे बस आगार – १३९