मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज मंडईतील मासळी विक्रेत्यांचे महात्मा जोतिबा फुले मंडई पुनर्विकास प्रकल्पातील इमारतीमध्ये कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन इमारतीमध्ये आवश्यक, तसेच अत्याधुनिक अशा सर्व सेवा-सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून या इमारतीमध्ये जागा वाटपाची प्रक्रिया ऑगस्ट २०२५ मध्ये सुरू करण्याचा महानगरपालिका प्रशासनाचा मानस आहे. महात्मा जोतिबा फुले मंडई पुनर्विकास प्रकल्पासाठी सुमारे ३०८ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून त्यात मासळी विक्रेत्यांच्या पुनर्वसन भागासाठी खर्च करण्यात येणाऱ्या सुमारे ११० कोटी रुपयांचा समावेश आहे.
छत्रपती शिवाजी महाराज मंडईची इमारत अतिधोकादायक घोषित झाल्याने त्या ठिकाणच्या मासळी विक्रेत्यांचे नजीकच्या ठिकाणी स्थलांतर करण्याची मागणी कोळी बांधव, संबंधित संघटना, तसेच लोकप्रतिनिधींनी महानगरपालिकेकडे केली होती. त्यानुसार, संबंधितांशी वेळोवेळी चर्चा करून महानगरपालिकेने पुनर्वसनाची कार्यवाही केली. नवीन इमारतीमध्ये आवश्यक, तसेच अत्याधुनिक अशा सर्व सेवा-सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज मंडईचे निष्कासन करण्यापूर्वी परवानाधारक ३४८ मासळी विक्रेत्यांचे विविध ठिकाणच्या मंडईमध्ये पर्यायी स्थलांतर करण्यात आले. ही इमारत जुलै २०२१ मध्ये निष्कासित करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज मंडई इमारत अतिधोकादायक जाहीर झाल्यापासून मंडईतील मासळी विक्रेत्यांचा व्यवसाय अबाधित रहावा यासाठी ते सातत्याने महानगरपालिकेकडे पाठपुरावा करीत होते. तसेच प्रशासनाकडून जागेचा शोध सुरू होता. दरम्यान, महात्मा जोतिबा फुले मंडईचा (पूर्वीचे क्रॉफर्ड मार्केट) पुनर्विकास प्रस्तावित होता. या पुनर्विकासाचे नियोजन व आराखड्याचे कामकाज २०१४ ते २०१६ या कालावधीमध्ये सुरू असताना महानगरपालिकेने या पुनर्विकास प्रकल्पामध्ये मासळी विक्रेत्यांसाठी एका इमारतीची तजवीज केली होती.
पुनर्विकसित नवीन इमारतीमध्ये आता मासळी विक्रेत्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यात येणार आहे. या इमारतीत वीज, पाणी, प्रसाधनगृह यांसारख्या आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. अग्निशमन सुरक्षा मंजुरी प्राप्त झाली असून इमारत भोगवटा प्रमाणपत्र देखील लवकरच प्राप्त होईल. पूर्वीच्या मंडईच्या तुलनेत नवीन मंडईच्या ठिकाणी अद्ययावत व वाढीव सुविधा उपलब्ध होणार आहेत. शीतगृह, ७८ चारचाकी वाहन क्षमतेचे वाहनतळ, मालाची चढ-उतार करण्यासाठी उतार (रॅम्प), धक्का (लोडिंग / अनलोडिंग प्लॅटफॉर्म), सरकता पट्टा (कन्व्हेयर बेल्ट), उद््वाहन, सांडपाणी पुनर्प्रक्रिया (एसटीपी/ ईटीपी) यांसारख्या सुविधांचा त्यात समावेश आहे. पुरातन वारसा असलेल्या महात्मा जोतिबा फुले मंडईचा पुनर्विकास करताना आतील भागात एक एकर क्षेत्रफळामध्ये हिरवळीचे क्षेत्र विकसित करण्यात येणार आहे.
निविदा प्रक्रिया पूर्ण
छत्रपती शिवाजी महाराज मंडईची अतिधोकादायक इमारत निष्कासित केल्यानंतर मोकळा झालेला भूखंड हा निविदा मागवून भाडेपट्टा तत्त्वावर देण्याची प्रक्रिया सुमारे सहा महिन्यांआधीच सुरू करण्यात आली होती. ही निविदा प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे.