मुंबई : वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत पहिल्या टप्प्यात दोन पुनर्वसित इमारतींचे काम म्हाडाच्या मुंबई मंडळाने पूर्ण केले असून या इमारतींना निवासी दाखलाही प्राप्त झाला आहे. असे असतानाही या घरांचा ताबा दिला जात नसल्याने रहिवाशांमध्ये नाराजी होती. घरांचा ताबा देण्याची मागणी सातत्याने होती. तर म्हाडाकडून घराचा ताबा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितली होती. अखेर मुख्यमंत्र्यांनी पुढील आठवड्यात ताबा देण्यात येईल असे जाहीर केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे ५५६ रहिवाशांची हक्काच्या घराची प्रतीक्षा संपणार आहे. वरळीतील ५५६ रहिवासी १८० चौरस फुटांच्या घरातून थेट ४० मजली इमारतीमधील ५०० चौरस फुटांच्या घरात राहयला जाणार आहेत.
ना. म. जोशी मार्ग, नायगाव, वरळी बीडीडी चाळींचा पुनर्विकास मुंबई मंडळाच्या माध्यमातून केला जात आहे. या तिन्ही ठिकाणच्या पहिल्या टप्प्यातील पुनर्वसित इमारतींची कामे सुरू आहेत. वरळीतील ९८६९ रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. तर पहिल्या टप्प्यात ९८६९ पैकी ३८८८ रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी १३ पुनर्वसित इमारती बांधण्यात येत आहेत. १३ इमारतींपैकी दोन इमारतींचे बांधकाम काही महिन्यांपूर्वीच पूर्ण झाले आहे. तर काही दिवसांपूर्वीच या इमारतींना निवासी दाखला प्राप्त झाला आहे. या दोन इमारतींमध्ये ५५६ घरांचा समावेश असून या इमारती ४० मजल्यांच्या आहेत.
मात्र घरांचा ताबा दिला जात नसल्याने रहिवाशांमध्ये नाराजी होती. स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांनी नुकतीच या इमारतींची पाहणी करून घरांचा ताबा लवकर द्यावा, अशी मागणी केली होती. त्याचवेळी मुंबई मंडळानेही घरांचा ताबा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितली होती. घरांचे काम पूर्ण होऊनही घरांचा ताबा दिला जात नसल्याने मंडळावर टीका होत होती. अखेर मुख्यमंत्र्यांनी पुढील आठवड्यात सोमवारी वरळीतील दोन पुनर्वसित इमारतींचा ताबा दिला जाईल, असे जाहीर करून रहिवाशांना दिलासा दिला.
पुढील आठवड्यात घरांचा ताबा दिला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. त्यानुसार आमची तयारी सुरू आहे. मुख्यमंत्र्यांची वेळ मिळाली की कार्यक्रमाची घोषणा होईल आणि ५५६ रहिवाशांचा घरांचा ताबा दिला जाईल अशी माहिती म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिली. दरम्यान, दोन पुनर्वसित इमारतीतील घरांचा ताबा कोणत्या रहिवाशांना दिला जाणार याची निश्चित या आधीच मंडळाने सोडतीद्वारे केली आहे. त्यानुसार चाळ क्रमांक ३०, ३१ आणि ३६ मधील रहिवाशांना घरांचा ताबा दिला जाणार आहे. या दोन्ही इमारती ताबा देण्याच्यादृष्टीने पूर्णत सज्ज झाल्या आहेत. रहिवाशांचे नामफलकही इमारतीच्या तळमजल्यावर लावण्यात आले आहेत. आता फक्त घराचा ताबा मिळण्याची रहिवाशांना प्रतीक्षा आहे.