मुंबई: पूर्व द्रुतगती मार्गावरील विक्रोळी परिसरात मंगळवारी पहाटे भरधाव वेगात धावणाऱ्या एका टेंपोने मोटारगाडीला धडक दिली. अपघातानंतर दोन्ही वाहने रस्त्यामध्येच उलटल्याने या परिसरात दोन तास वाहतूक कोंडी झाली होती. सुदैवाने या अपघातात कोणीही गंभीर जखमी झाले नाही.

मुंबईहून मंगळवारी सकाळी ६.३० च्या सुमारास ठाण्याच्या दिशेने एक टेम्पो आणि एक टाटा सफारी मोटारगाडी जात होती. दोन्ही वाहने भरधाव वेगात धावत होती. विक्रोळी उड्डाणपुलावर टेम्पोने मोटरगाडीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेनंतर मोटारगाडी रस्त्यावर उलटली. तसेच टेम्पोही दुभाजकावर धडकून दुसऱ्या मार्गावर उलटा झाला. दोन्ही वाहने रस्त्याच्या मधोमध उलटी झाल्याने मुंबईहून ठाण्याकडे जाणाऱ्या आणि मुंबईकडे येणाऱ्या आशा दोन्ही मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.

घटनेची माहिती मिळताच विक्रोळी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन वाहनांमध्ये अडकलेल्या तिघांना बाहेर काढले. सुदैवाने या अपघातात कोणीही गंभीर जखमी झाले नाही. टेम्पो चालक अंकित दुबेला (३८) किरकोळ दुखापत झाली असून त्याच्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सकाळी ८ च्या सुमारास ही दोन्ही वाहने रस्त्यावरून हटविण्यात आली. त्यानंतर पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.