मुंबई : दुचाकीचा धक्का लागल्यामुळे जाब विचारला असता तिघांनी २२ वर्षीय तरूणाची हत्या केल्याची घटना साकीनाका येथे घडली. साकीनाका पोलिसांनी याप्रकरणी तपास करून सहा तासांत आरोपींना अटक केली. तिघे एकाच दुचाकीवरून प्रवास करीत होते.

मोहम्मद सुहेब ऊर्फ शोहेब सुहेबुद्दीन इमामुद्दीन अन्सारी (२२) हा जरीकाम करणारा कामगार होता. तो साकीनाका येथील खैराणी रोड येथून रविवारी दुपारी चालत जात होता. त्यावेळी एस. जे. स्टुडिओ समोर त्याला एका दुचाकीचा धक्का लागला. त्यावेळी अन्सारी त्यांना ओरडला असता आरोपींनी दुचाकी थांबवली. त्यानंतर दुचाकीवरील तिघे खाली उतरले व त्यांनी अन्सारीसोबत वाद घालण्यास सुरूवात केली. या वादानंतर तिघांनी अन्सारीला मारहाण केली.

हेही वाचा…मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवारी वाहतूक ब्लॉक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपींनी पेव्हरब्लॉकने अन्सारीला मारहाण केली. त्यात गंभीर जखमी झाल्यामुळे अन्सारी खाली कोसळला. त्यानंतर पादचाऱ्यांनी अन्सारीला साकीनाका येथील पॅरामाऊंट रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून अन्सारीला मृत घोषित केले. याप्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी प्रत्यक्षदर्शींकडून घटनेची माहिती घेतली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या आरोपींच्या वर्णनावरून गोवंडी शिवाजी नगर येथून तिघांना ताब्यात घेण्यात आले. अनस शेख (२१), गुल्फराज खान (२३) व अफजल सय्यद यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनीच अन्सारीला मारहाण केल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्यात तिघांनाही अटक केली.