मुंबई : विलेपार्ले येथील साठये महाविद्यालयात आत्महत्या केलेल्या संध्या पाठक (२१) या तरुणीच्या पार्थिवावर गुरूवारी रात्री नालासोपारा येथील आचोळे स्मशानभूमीतअंत्यसंस्कार करण्यात आले. संध्या एक उद्योनमुख लेखिका होती. वयाच्या विशीतच तिने प्रेमकथेवर लिहिलेले पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले होते. संध्या आत्महत्या करूच शकत नाही, असा दावा तिच्या कुुटुंबियांनी पुन्हा एकदा केला असून या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.

संध्या नालासोपाऱ्यातील आचोळे येथे वास्तव्यास होती. ती विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेच्या (बीएस्सी स्टॅटेस्टीक्स) तिसऱ्या वर्गात शिकत होती. गुरूवारी सकाळी ७.१५ च्या सुमारास तिने महाविद्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. संध्याच्या मृत्यूबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. हसरा, खेळकर स्वभाव, मनमिळावू वृत्ती यामुळे ती मित्र-मैत्रीणीत परिचित होती. संध्या प्रचंड हुशार होती. नालासोपारा येथे प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर तिने विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. तिला लिखाणाची आवड होती. लेखिका होण्याचे तिचे स्वप्न होते. वयाच्या विशीतच तिचे ‘द वर्ल्ड बेस्ट एक्सफ्रेंड’ हे पहिले इंग्रजी पुस्तक प्रकाशित झाले होते. तारूण्यातील प्रेम, विरह आणि मैत्रीचे बंध उलगडून टाकणारी ही कांदबरी प्रसिध्द झाली होती. ‘अमेझॉनवर’ या ई कॉमर्स संकेतस्थळावर हे पुस्तक एप्रिल महिन्यात प्रसिध्द झाले होते, असे तिच्या मावस भावाने सांगितले.

संध्याच्या मृतदेहावर कूपर रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. वरून खाली पडल्याने तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. रात्री संध्याचा मृतदेह तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. गुरूवारी रात्री नालासोपारा पूर्व परिसरातील आचोळे येथील तिच्या निवासस्थानी मृतदेह आणण्यात आला. आचोळे स्माशानभूमीत तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होेते. संध्याने आत्महत्या केल्याची बातमी माध्यमात प्रसिद्ध झाल्यामुळे नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.

संध्या आत्महत्या करूच शकत नाही- कुटुंबियांचा दावा

संध्या मध्यमवर्गीय कुटुंबातील होती. तिला एक लहान बहिण आहे. वडील खासगी कंपनीत काम करतात. संध्याचा मृत्यू आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. माझी भाची आत्महत्या करूच शकत नाही. तिला आत्महत्या करायची असती तर तिने घरातच केली असती किंवा ट्रेन खाली उडी मारली असती. आत्महत्या करायला ती महाविद्यालयात का जाईल ? असा सवाल सांताक्रूझ येथे राहणाऱ्या संध्याच्या मावशीने केला. हा संपूर्ण प्रकार संशयास्पद आहे. संध्या तिसऱ्या मजल्यावर जाताना सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण उपलब्ध आहे. मग खाली पडतानाचे सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण का नाही, असा सवालही त्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संध्याला न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. संध्याचा मृत्यू झाला तरी महाविद्यालय सुरूच असल्याबद्दल कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली. संध्यासाठी आम्ही १० हजार रुपये खर्च केल्याचे महाविद्यालय प्रशासनाने सांगितले. परंतु एवढी दुर्देवी घटना घडल्यानंतरही दुपारी महाविद्यालय नियमित सुरू होते. ही महाविद्यालयाची असंवेदनशीलता असल्याचे संध्याच्या मावशीने सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चौकशीला संपूर्ण सहकार्य करणार – महाविद्यालय प्रशासन

दरम्यान, महाविद्यालयाने प्रसिध्दी पत्रक काढून या प्रकणात पोलिसांना सहकार्य करत असल्याचे स्पष्ट केले. संध्या सकाळी ७.१५ वाजता मुख्य प्रवेशद्वाराच्या शेजारी असलेल्या इमारतीजवळ रक्ताच्या थारोळ्यात आढळली. तिला तात्काळ खासगी रुग्णलायात दाखल करण्यात आले, असे प्राचार्य माधव राजवाडे यांनी सांगितले.