माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक मागील काही दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या जामीन अर्जावर आज ( ३० नोव्हेंबर ) मुंबईतील सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. पण, न्यायालयाने नवाब मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांच्या पीठासमोर मलिक यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. न्यायालयाने जामीन नाकारताना म्हटलं की, प्रकरणाशी संबंधित मालमत्तेची मूळ मालकीण असलेल्या मुनीरा प्लम्बर हिने दिलेला जबाब आणि न्यायालयात सादर केलेले पुरावे परस्परविरोधी आहे. तरी तिचा जबाब पूर्णतः बाजूला ठेवता येणार नाही.

प्रकरणातील आणखी एक मुख्य साक्षीदार सरदार खान याचा जबाबही निर्णय देताना विचारात घेतल्याचे न्यायालयाने सांगितलं. याशिवाय मालमत्ता खरेदी करण्यासाठी मलिक यांनी मुनीरा हिला थेट संपर्क साधल्याचा पुरावा सादर करण्यात आलेला नाही, असेही न्यायालयाने मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळताना नमूद केले. दरम्यान, मलिक यांच्यावर कुर्ल्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हेही वाचा : एकनाथ शिंदेंच्या बंडाची शिवरायांशी तुलना करणाऱ्या मंत्री लोढांना अजित पवारांनी खडसावलं; म्हणाले, “वाचळविरांना आवरा हे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय आहे प्रकरण?

दाऊद इब्राहीम टोळी क्रिकेटवरील सट्टेबाजी आणि बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार करत असल्याच्या आरोपावरून ‘ईडी’ने दाऊद आणि त्याच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी ‘ईडी’ने दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला ताब्यात घेऊन चौकशी केली़ दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे ३०० कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी मलिक यांचा संबंध असल्याचे ‘ईडी’ला तपासात आढळले होते. त्यानंतर ईडीने नवाब मलिक यांना २३ फेब्रुवारी २०२२ ला अटक केली होती.