मुंबई : व्यवसायात पैसे गुंतवूनही वडिलांनी नफ्याची रक्कम देण्यास नकार दिल्याने एका मुलाने त्याच्या ७० वर्षाच्या वडिलांचा मारेकऱयांकरवी खून केला. चारकोप पोलिसांनी याप्रकरणी मुलासह त्याचा मित्र आणि खून करणाऱया एका मारेकऱयाला अटक केली आहे. रविवारी कांदिवलीत हा प्रकार घडला होता.
वृध्द व्यावसायिकाची कारखान्यात हत्या
मोहम्मद सय्यद (७०) हे व्यावसायिक आहे. कांदिवलीच्या चारकोप येथील शासकीय औद्योगिक वसाहतीत त्यांचा धातूचा कारखाना आहे. धातू वितळवून तो साच्यात (मोल्डमध्ये) ओतून त्याला आकार देण्याची प्रक्रिया या कारखान्यात केली जाते. याशिवाय एक काचेचा कारखाना आहे. रविवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे आपल्या चारकोप येथील कारखान्यात आले होते. त्यानंतर दुपारी १२ च्या सुमारास त्यांच्या मृतदेह कारखान्यात आढळला. अज्ञात व्यक्तीने चाकूचे वार करून त्यांची हत्या केली होती.
सीसीटीव्हीत दिसले दोन हल्लेखोर
कारखान्याबाहेर लावलेल्या सीसीटीव्हीत हत्येचा प्रकार समोर आला आहे. रविवारी सकाळी दोन अज्ञात व्यक्ती सय्यद यांच्या कारखान्यात आल्याचे दिसले. सुमारे एक तास हे दोन्ही हल्लेखोर कारखान्यात होते. दोन हल्लेखोरांनी चाकूने सय्यद यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यानंतर त्यांनी हत्यार कारखान्यातील पाण्याच्या टाकीत टाकले होेते. पोलिसांनी हे शस्त्र जप्त केले आहे. त्यांच्या शोधासाठी परिमंडळ ११ च्या अंतर्गत विविध पथके तयार करण्यात आली होती. आर्थिक वादातूही ही हत्या झाली असावी अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली होती आणि त्यादृष्टीने तपास सुरू होता.
मुलाने दिली हत्येची सुपारी
चारकोप पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे माग काढून एका हल्लेखोराला नवी मुंबईतून अटक केली. मोहम्मद इस्लाम (२६) असे त्याचे नाव आहे. आपल्या साथीदारासह त्याने वृध्द व्यावसायिक मोहम्मद सय्यद याची हत्या केल्याची कबुली दिली. मात्र हत्येची सुपारी कुणी दिली असे विचारल्यावर त्याने जे उत्तर दिलं ते ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. ही हत्या मयत मोहम्मद सय्यद याचा मुलगा हमीद सय्यद (४१) आणि त्याचा व्यावसायिक भागादीर शानू चौधरी याने सुपारी देऊन घडविल्याची माहिती त्याने दिली.
मुलगा आणि त्याच्या मित्राला अटक
यानंतर चारकोप पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवली आणि त्वरीत मयत मोहम्मद सय्यद यांचा मुलगा हमीद सय्यद (४१) तसेच त्याचा भागीदार मित्र शानू चौधरी (४०) याला अटक केली. त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. हत्या करणाऱया दुसऱया हल्लेखोराचा शोध सुरू आहे.
व्यवसायात नफा न दिल्याने हत्या…
याबाबत चारकोप पोलिसांनी सांगितले, मयत मोहम्मद सय्यद यांचा काचेचा कारखाना होता. त्यांचा लहान मुलगा हमीद आणि त्याचा भागीदार शानू चौधरी (४०) यांनी काचेच्या कारखान्यात गुंतवणूक केली होती. शानू चौधरी याने १ कोटी गुंतवले होते. मात्र मयत मोहम्मद सय्यद यांच्याशी नफ्याच्या रकमेवरून वाद झाला होता. वडिलांनी नफ्याची रक्कम देण्यास नकार दिला होता. तो कारखाना एक महिन्यापासून बंद होता. याशिवाय मयत सय्यद यांनी ती जागा विकायला काढली होती. त्यामुळे मुलाने आणि त्याच्या भागीदाराने मोहम्मद सय्यद यांच्या हत्येचा कट रचला होता. त्यासाठी त्यांनी मोहम्मद इस्लाम (२७) याला साडेसहा लाखांची सुपारी दिली होती.