मुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीत वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे विशेष स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अमृता सुभाष आता प्रथमच एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. ‘परिणती – बदल स्वतःसाठी’ हा मराठी चित्रपट येत्या १ ऑगस्ट २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय बाळसराफ दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती पराग मेहता आणि हर्ष नरूला यांनी केली आहे.

दरम्यान, ‘परिणती – बदल स्वतःसाठी’ चित्रपटाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये दोन स्त्रिया दिसत आहेत. यापैकी एक स्त्री रंगीबेरंगी पारंपरिक पोशाखात असून तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि एक वेगळा आकर्षक बाणेदारपणा दिसत आहे. तर दुसरी स्त्री साधेपणात गुंतलेली दिसत आहे. त्यांच्या वेगवेगळ्या पार्श्वभूमी आणि भावविश्वाचा संगम चित्रपटाच्या आशयाची झलक देतो. सन्मान, अस्तित्व आणि मुक्ततेसाठी लढणाऱ्या दोन स्त्रियांची ही कहाणी आहे, त्यांच्या लढ्याची कारणे वेगवेगळी आहेत. परंतु स्वतःसाठी बदल घडविणे हा दोघींचा एकमेव उद्देश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘परिणती’ या चित्रपटात मी अशा दोन स्त्रियांना एकत्र आणले आहे, ज्यांची एका वळणावर मैत्री होते आणि त्यातून त्यांचे आयुष्य बदलते. सोनाली आणि अमृता यांनी या भूमिकांमध्ये जीव ओतला आहे. ‘परिणती’ ही त्यांच्या वाटचालीची, बंडाची, आणि स्वतःला सापडण्याची कहाणी आहे. ‘परिणती’ प्रेक्षकांचे केवळ मनोरंजनच करणार नाही, तर विचार करण्यास भाग पाडेल,’ असे चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक अक्षय बाळसराफ यांनी सांगितले.