मुंबई : मुंबईसारख्या महानगरात जैवविविधतेच्यादृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील जंगल क्षेत्राची स्थिती चिंताजनक असल्याचे नुकतेच एका अभ्यासातून समोर आले आहे. त्यानुसार उद्यानाच्या केवळ ३.३६ टक्के जंगल क्षेत्राची स्थिती ‘घनदाट’ असल्याचे स्पष्ट झाले आहे तर तब्बल ३९.५२ टक्के क्षेत्र ‘निकृष्ट’, आणि ३६.५१ टक्के क्षेत्र ‘मध्यम घनदाट’ म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे.
‘असेसिंग फॉरेस्ट हेल्थ ऑफ संजय गांधी नॅशनल पार्क, मुंबई ‘ हा अभ्यास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक (भू-आकारविज्ञान), डॉ. रवींद्र मेढे आणि त्यांचे विद्यार्थी चैतन्य कोळेकर यांनी एकत्रितपणे केला आहे. हा अभ्यास जानेवारी २०२४ मध्ये करण्यात आला असून, ८ मे २०२५ रोजी ‘इंटेक ओपन’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रकाशित करण्यात आला आहे. त्यानुसार ‘सेंटिनेल-२ए’ या युरोपियन उपग्रहाद्वारे मिळालेल्या हाय-रिझोल्युशन प्रतिमा वापरल्या गेल्या. त्याशिवाय जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम सॉफ्टवेअर आणि विविध वनस्पती निर्देशांक वापरून जंगल क्षेत्राचे विश्लेषण करण्यात आले. या अभ्यासात उद्यानातील हरित पट्ट्याचे अधिक सखोल विश्लेषण केले आहे.
विविध सूचक निर्देशांक वापरल्यामुळे जंगलाच्या स्थितीचा अधिक स्पष्ट आणि विज्ञानाधिष्ठित आढावा घेता आला असल्याचे प्राध्यापक डॉ. मेढे यांनी सांगितले. दरम्यान, राष्ट्रीय उद्यान मुंबईच्या मध्यवर्ती भागात असूनही जंगलाचे अस्तित्व टिकवून आहे. मात्र झपाट्याने होणारे शहरीकरण, अतिक्रमणे, वातारणातील आर्द्रतेत घट आणि मानवी हस्तक्षेप यांमुळे उद्यानातील जैवविविधतेवर मोठा परिणाम झाला असल्याचे या अभ्यासात नमूद केले आहे. फक्त ३.३६ टक्के क्षेत्र घनदाट असणे ही बाब धोका दर्शवणारी आहे. या परिस्थितीत सुधारणा होणे आवश्यक आहे. मध्यम घनदाट क्षेत्रांचे पुनरुज्जीवन आणि घनदाट क्षेत्रांचे संरक्षण करणे हे अत्यंत गरजेचे आहे असेही डॉ. मेढे यांनी सांगितले.
भविष्यातील उपाययोजना आणि गरज
या अभ्यासातून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची सध्याची स्थिती समजली असली, तरी जंगल क्षेत्रातील हानीमागची खरी कारणे शोधण्यासाठी अधिक दीर्घकालीन, बहुआयामी संशोधनाची गरज आहे, असे संशोधकांचे म्हणणे आहे.
ऱ्हासाची संभाव्य कारणे
उद्यानाच्या सीमेलगत झोपडपट्ट्यांचे वाढते अतिक्रमण हे एक मोठे कारण आहे. अनेक ठिकाणी लोकांनी जंगलात घरे बांधली आहेत, ज्यामुळे जैवविविधतेला धोका निर्माण होतो. हवामानात होत असणाऱ्या बदलांचा परिणाम तेथील जंगल क्षेत्रावर होत आहे. परिणामी हरित पट्ट्यात घट होते.जंगलात अनधिकृतपणे तयार करण्यात येणारे रस्ते व पायवाटा या वनस्पती व प्राण्यांच्या अधिवासात हस्तक्षेप करतात.उद्यानाच्या सीमेलगत झोपडपट्ट्यांचे वाढते अतिक्रमण हे एक मोठे कारण आहे. अनेक ठिकाणी लोकांनी जंगलात घरं बांधली आहेत, त्यामुळे जैवविविधतेला धोका निर्माण होतो. उन्हाळ्यात किंवा मानवनिर्मित कारणांमुळे लागणाऱ्या आगीमुळे मोठ्या प्रमाणावर झाडे जळतात.