– धवल कुलकर्णी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या राज्यामध्ये सुरू असलेल्या लॉकडाउनचा कालावधी निदान काही ठिकाणी वाढवला जाईल अशी शक्यता असतानाच, मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल ट्रेनही कदाचित एवढ्यात सुरू होणार नाही असे संकेत मिळत आहेत. देशामध्ये ८० टक्के करोनाबाधित सुमारे ६२ जिल्ह्यांमध्ये केंद्रीत झाले असल्याचे नुकतेच स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर सर्वाधिक रूग्ण व संशयित मुंबई व पुण्यासारख्या महानगरांमध्ये आढळले आहेत, व त्यांच्या संख्येत दिवसांगणिक वाढ होताना दिसत आहे.

या पार्श्वभूमीवर लोकसत्ता डॉट कॉमनं एका ज्येष्ठ मंत्र्याशी संवाद साधला असता त्यांनी लॉकडाउनबाबतचा अंतिम निर्णय दहा तारखेच्या आसपास होऊ शकतो असे सांगितले. मुंबईमध्ये एकूणच वाढणाऱ्या करोनाच्या रुग्णांची संख्या, मोठ्या प्रमाणावर आणि दाटीवाटीने असलेली लोकसंख्या आणि मुंबई शहरामध्ये आसपासच्या भागातून येणाऱ्यांचा प्रचंड मोठा आकडा या गोष्टी विचारात घेता लोकल ट्रेन एवढ्यात सुरू होणार नाहीत अशीच लक्षणं आहेत. या लोकप्रतिनिधीनं सांगितलं की समजा परिस्थिती नियंत्रणात न येता चिघळली तर कदाचित महिन्याअखेर पर्यंत लोकल ट्रेन बंद ठेवल्या जाऊ शकतात.

मुंबईत सोमवारी दिवसभरात ५७ नवे रुग्ण आढळले असून चार जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील करोनाबाधितांचा आकडा ४९० वर गेला आहे. त्यापैकी ३४ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून ५९ जण करोना मुक्त होऊन घरी गेले आहेत. तर अजून १५० संशयित रुग्ण दाखल आहेत. पुण्यातील रुग्णांच्या संख्येतही अचानक वाढ झाली असून सोमवारी एका दिवसात ३७ नवे रुग्ण आढळले. मुंबई आणि पुण्यात दिवसेंदिवस रुग्णांचा आकडा वाढत असून वेगवेगळे परिसर प्रतिबंधित करण्यात येत आहेत. सोमवापर्यंत मुंबईत २२६ परिसर प्रतिबंधित करण्यात आले.

राज्यातल्या काही भागात म्हणजे जिथे करोनाचा प्रकोप फारशा मोठ्या प्रमाणावर नाही अशा ठिकाणी मात्र टाळेबंदी अंशतः का होईना उठवली जाऊ शकते. तसे झाले तरीसुद्धा सर्व जिल्ह्यांच्या बॉर्डर सील केल्या जातील, जेणेकरून लोक एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाणार नाहीत आणि करोना चा प्रसार सुद्धा होणार नाही.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai suburban local service may not start soon dhk
First published on: 07-04-2020 at 12:31 IST