मुंबई : राज्यातील विविध महाविद्यालयांमध्ये विधि पाच वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया अखेर पूर्ण झाली. यावर्षी एकूण १० हजार २६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. तर एकूण १३ हजार ५८९ जागांपैकी ३ हजार ५६३ जागा रिकामी राहिल्या आहेत.

राज्यातील कायद्याचे शिक्षण घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांसाठी विधि ५ वर्षांचा अभ्यासक्रम हा एक महत्त्वाचा पर्याय असून, त्यासाठी दरवर्षी सीईटी परीक्षा घेतली जाते. यंदाही राज्य व बाह्य राज्यातील उमेदवारांना समान काळात प्रवेश नोंदणीची संधी देण्यात आली होती. विधि पाच वर्ष अभ्यासक्रमाचा सीईटीचा निकाल ४ जून रोजी जाहीर झाला. या निकालात यंदा २७ हजार ३७२ उमेदवार पात्र ठरले होते. यापैकी २० हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली होती. या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशाच्या एकूण चार फेऱ्या राबविण्यात आल्या. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांचा ओढा प्रामुख्याने प्रमुख शहरांतील नामांकित महाविद्यालयांकडे होता. मात्र, अल्पसंख्यांक व खाजगी महाविद्यालयांतील व्यवस्थापन तसेच अल्पसंख्यांक कोट्यांतील जागा तिसऱ्या फेरीपर्यंत रिक्तच राहिल्या. अखेर चौथ्या आणि अंतिम फेरीत सर्वाधिक प्रवेश झाले आणि मोठ्या प्रमाणावर रिक्त जागांवर प्रवेश झाले.

फेरिनिहाय झालेले प्रवेश

सीईटी सेलच्या आकडेवारीनुसार, पहिल्या फेरीत ८ हजार ८८ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली होती, त्यापैकी ३ हजार ९० विद्यार्थी प्रत्यक्ष प्रवेशित झाले. दुसऱ्या फेरीत १ हजार ४११ विद्यार्थी प्रवेशित झाले. तिसऱ्या फेरीत ५ हजार ४५३ अलॉटमेंटमधून ३ हजार १६९ प्रवेश झाले, तर अखेरच्या चौथ्या फेरीत २ हजार ३५६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.

दोन वर्षातील प्रवेशाची आकडेवारी

२०२४-२५ मध्ये एकूण १२ हजार ७३१ जागा उपलब्ध होत्या, त्यापैकी ९ हजार ४३८ प्रवेश झाले होते. त्यात ४ हजार ५११ पुरुष व ४ हजार ९२७ महिला विद्यार्थी होते. तर ३ हजार २९३ जागा रिक्त राहिल्या होत्या. मात्र यंदा जागांमध्ये वाढ झाली होती. यंदा विधि पाच वर्ष अभ्यासक्रमासाठी १३ हजार ५८९ इतक्या झाल्या होत्या. तर केवळ १० हजार २६ जागांवर प्रवेश झाले तर ३ हजार ५६३ जागा रिक्त राहिल्या. वर थांबली आहे.