मुंबई : टोरेस फसवणूक प्रकरणात सक्त वसुली संचलनालयाने (ईडी) मुंबई व सुरत येथील चार ठिकाणी छापे टाकले. ईडीने या कारवाईत सहा कोटी ३० लाख रुपयांच्या रोख रकमेसह डिजिटल पुरावे जप्त केले आहेत.मुंबई, ठाणे, कल्याण अशा वेगवेगळ्या भागांमध्ये ‘टोरेस’ नावाने शाखा उघडून ग्राहकांना सोने, चांदी आणि हिऱ्याचे दागिने देणाऱ्या कंपनीने हळूहळू पैशांत गुंतवणूक स्वीकारायला सुरुवात केली. वर्षभर व्यवसायही केला. पण संधी मिळताच हजारो कोटी घेऊन पोबारा केला.

‘टोरेस’ गैरव्यवहार प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेसह सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली. याप्रकरणी नऊ विदेशी आरोपींविरोधात ब्लू कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आली आहे.

ईडीच्या तपासानुसार. मे प्लाटिनम हेर्न प्रा. लि.कंपनीने हिरे आणि इतर दागिन्यांच्या विक्रीच्या बदल्यात ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम जमा केली. ही रोख रक्कम कायदेशीर व्यवसायासाठी वापरण्याऐवजी हवाला ऑपरेटरमार्फत परदेशात पाठवण्यात आली आणि नंतर ती यूएसडीटी या कूट चलनात रुपांतरित करण्यात आली. त्यासाठी हवाला ऑपरेटर अल्पेश खारा याने महत्त्वाची भूमिका बजावली. खाराने फरार आरोपी अलेक्स आणि ओलेना स्टोयान यांच्या सूचनेनुसार मुंबईतील टोरेस दागिने शो रूममधून मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम जमा करण्यास मदत केली.

तिच रक्कम पुढे कूट चलनात रुपांतरित करण्यात आली. त्यानंतर ईडीने खाराला २६ मार्चला अटक केली होती. याप्रकरणात ईडीने मुंबई व सुरत येथील संबंधित अंगडिया व हवाला ऑपरेटरांच्या ठिकाणी छापे टाकले. त्यात सहा कोटी ३० लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. तसेच महत्त्वाची डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली. यापूर्वी २३ जानेवारीला ईडीने राबवलेल्या शोध मोहिमेत २१ कोटी ७५ लाख रुपयांची बँक खाती गोठवण्यात आली होती.

हवाला ऑपरेटर अल्पेश खाराच्या आर्थिक व्यवहारांचे तपशील फाइनान्शियल इंटेलिजन्स युनिटकडे (एफआययू) पाठवण्यात आले होते. प्राथमिक तपासणीत अंदाजे १०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम विविध क्रिप्टो वॉलेट्सद्वारे ‘यूएसडीटी’मध्ये (टिथर कूट चलन) रूपांतरित करून युक्रेनियन आरोपींना पाठवण्यात आल्याचा संशय आहे. पण, एफआययूच्या तपासातही अल्पेश खाराकडे याच्या कूट चलन खात्यातून कोणतीही रक्कम हस्तांतरित झालेली नाही. त्यासाठी त्याने मोठ्या प्रमाणात कूट चलन वॉलेटचा वापर केल्याचा संशय आहे. याप्रकरणी ईडी अधिक तपास करीत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रक्कम हस्तांतरणाची कार्यपद्धती

तपासादरम्यान खारा स्वत: फसवणूक निधीचे थेट क्रिप्टोमध्ये रूपांतर करीत नव्हता. त्याने विविध हँडलर, मध्यस्थ आणि दलाल यांच्या माध्यामतून हे जाळे उभे केले होते. त्यात छोट्या छोट्या रकमेत कूट चलन परदेशात पाठवण्यात आले. त्यामुळे त्याचा माग काढणे कठीण होत आहे. ईडीच्या तपासानुसार, खाराने ‘व्हॉट्स ॲप’ आणि ‘टेलिग्राम’वर गुप्त गट तयार करून रोख रक्कम संकलन, हस्तांतरण आणि रूपांतराचे नियोजन केले होते. यामधून खाराने टोरेस ज्वेलरीच्या दादर येथील शो रूमच्या कर्मचाऱ्यांना एन्क्रिप्टेड संदेश पाठवून, त्याच्या नेमलेल्या एजंटना ठरावीक रक्कम सोपवण्याची सूचना केली होती. या कामासाठी खाराला आरोपी अलेक्सकडून दोन टक्के कमिशन मिळत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.