मुंबई : मुंबईत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणचे सखलभाग जलमय झाले आणि त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला. त्याचा फटका सोमवारी सकाळी कार्यालयात जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांना बसला आहे.
मुंबईत रविवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अंधेरी भुयारी मार्गावर पावसामुळे परिणाम झाला. कर्नाक पूल बंद असल्याने दक्षिण दिशेने जाणाऱ्या अवतार सिंग बेदी वाडीबंदर या मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू आहे. तेथेही पाणी साचले आहे. पूर्व मुक्त मार्गावरील दक्षिण वाहिनीवरीलही वाहतूक संथगतीने सुरू असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. मलबार हिल परिसरातील नारायण दाभोळकर मार्गावरही पाणी भरल्यामुळे वाहतूकीवर परिणाम झाला आहे. याशिवाय परळ येथील एल्फिन्स्टन पुलावरही पाणी भरले आहे.
मुसळधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग, दक्षिणेकडे जाणाऱ्या सिबा मार्ग येथील वाहतूक संथगतीने सुरू आहे. अंधेरी मार्केट,. जे. जे पुल येथीलही वाहतुकीची गती मंदावली आहे, असे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले आहे. वरळी नाका उत्तर वाहिनी, वांद्रे बँड स्टँड, जे.जे. मार्ग, हिंदमाता, माटुंगा किंग सर्कल, वाकोला राम नगर सबवे येथे पाणी साठले आहे. त्यामुळे या परिसरात जोडणाऱ्या मार्गिकांवरील वाहतुक संथ गतीने सुरू आहे.
बंद वाहनांमुळे कोंडीत भर…
दादर येथे विद्युत बस बंद पडल्यामुळे दादर येथील टिळक पुलावरील दक्षिण वाहिनीवरील वाहतुकही धीम्या गतीने सुरू आहे. याशिवाय पश्चिम उपनगरातील अंधेरी ब्रीज काईंब(सहार) येधेही सिमेंट मिक्सर बंद पडल्यामुळे तेथील उत्तरेकडे जाणारी वाहतुकीवरही परिणाम झाला आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. दोन्ही ठिकाणांवरील वाहने बाजूला करण्याचे काम सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्रादेशिक हवामान विभागाने मुंबईसाठी दुपारी १२ वाजेपर्यंत अतिवृष्टीचा (रेड अलर्ट) इशारा दिला आहे. तर ठाणे आणि पालघर भागाला सतर्कतेचा (यलो अलर्ट) इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी प्रतितास ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहतील. तसेच विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. दरम्यान, मुंबईत रविवारी मध्यरात्रीपासून पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. ग्रॅंन्ट रोड येथील नाना चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.यामुळे कामगार वर्गाला या पाण्यातून मार्ग काढत जावे लागत आहे. संततधार पावसामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.