मुंबई : मुंबईत बुधवारी सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणचे पाणी अद्याप ओसरलेले नाही. काही ठिकाणी खड्डे पडले असून वाहने बंद पडल्याच्या घटना घडत आहे. लोकल बंद झाल्यामुळे लोकांनी रस्ते मार्गे जाण्यास सुरुवात केली.

पावसामुळे मुंबईकरांचे हाल सुरूच आहे. बुधवारी देखील रेल्वेचा खोळंबा झाला असून दुसरीकडे रस्त्यावरही वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईमधील विविध भागात सकाळपासूनच वाहने बंद पडल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे.

मुंबईत कुठे वाहतूक कोंडी ?

मुंबई वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र नगर बोगदा (ट्रॉम्बे,मानखुर्द ) टी जंक्शन येथे पावसाचे ७ ते ८ फूट पाणी साचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे . मोगरा मेट्रो स्टेशन (जोगेश्वरी ) येथे रस्त्यावर मोठा खड्डा पडल्याने अपघात होण्याची शक्यता वाहतूक पोलिसांनी वर्तवली आहे.

सांताक्रूझ येथील वाकोला पूलावर एक वाहन बंद पडल्याने वाहतूक कोंडी झाली होती. हे वाहन हटविण्याचे प्रयत्न वाहतूक पोलिसांकडून सुरू आहेत. या बिघाडामुळे वाकोला पूल येथे उत्तरेकडे जाणारी वाहतूक संथगतीने सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. विद्युत वाहनाच्या बिघाडामुळे नालंदा बस स्टॉप (घाटकोपर) येथे दक्षिणेकडे जाणारी वाहतूक संथगतीने सुरू आहे. आरे करशेड (दिंडोशी) येथे पावसाचे पाणी साचल्याने तेथील वाहतूक संथगतीने सुरू आहे.

आमचे सर्व कर्मचारी तैनात असून वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पाणी साचल्यामुळे कामात अडथळा येत असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.